राज्यात पावसाचा हाहाकार!आतापर्यंत ८४ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. ठिकठिकाणी पुरात लोक वाहून गेल्याच्या घटना घडत आहेत. रस्त्यांवर दरड कोसळण्याच्या घटना तसेच पुराचे पाणी पुलांवरून वाहत असल्याने अनेक ठिकाणी रस्ते, महामार्ग बंद झाले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

मुंबई, कोकण भागात येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यावेळी ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

मुसळधार पावसामुळे कोकणात पर्यटन जवळपास बंद आहे. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. मराठवाड्यात हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या अनेक गावांत पाणी शिरल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे.