शेतकऱ्याला कुऱ्हाडीच्या दांड्याने जबर मारहाण: तिघा आरोपींना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि प्रत्‍येकी २० हजार रुपये दंड

औरंगाबाद,१४ जुलै /प्रतिनिधी :-शेतात जनावरे आल्याचा जाब विचारणाऱ्या  शेतकऱ्याला कुऱ्हाडीच्या   दांड्याने जबर मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी यांनी ठोठावलेल्या शिक्षे विरोधात तिघा आरोपींनी सत्र न्‍यायालयात अपील दाखल केले होते. अपीलावरील सुनावणी अंती तिघा आरोपींना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि प्रत्‍येकी २० हजार रुपये दंडाची शिक्षा प्रधान जिल्हा व सत्र न्‍यायाधीश वाय.जी. खोब्रागडे यांनी गुरुवारी  ठोठावली.

हा  खटला सुरु असताना फिर्यादीचा मृत्‍यू झाल्याने आरोपींना ठोठावलेल्या दंडाची रक्कम ही मयत फिर्यादीच्‍या पत्‍नीस देण्‍याचे आदेश न्‍यालयाने दिले. तसेच प्रथम वर्ग न्‍यायालयाने ठोठावलेल्या प्रत्‍येकी एक हजार रुपय दंडाची रक्कम शासन दरबारी जमा करण्‍याचे आदेश देखील न्‍यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी लोकाभियोक्ता सुनिलकुमार बर्वे यांनी काम पाहिले.

दिगंबर उत्तम गिरगे (५६), संदीप दिगंबर गिरगे (३८) आणि बाळसाहेब दिगंबर गिरगे (३५ सर्व रा. मायगाव ता. पैठण) अशी आरोपींची नावे आहेत.या गुन्‍ह्यात पैठण येथील प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी यांनी तिघा आरोपींना भादंवी कलम ३२४ अन्‍वये तीन महीने सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. तसेच नुकसान भरपाई म्हणुन फिर्यादीच्‍या पत्‍नीला दंडाची रक्कम देण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिले होते. या आदेशा विरोधात आरोपींनी सत्र न्‍यायालयात अपील दाखल केले होते.

या प्रकरणात मृत  तुकाराम बाळाजी गिरगे (६०, रा. मायगाव ता. पैठण) यांनी फिर्याद दिली होती. ७ एप्रिल २००७ रोजी दुपारी १२ वाजेच्‍या सुमारास फिर्यादी हे आपल्या शेतातील ऊसात चक्कर मारण्‍यासाठी गेले होते. त्‍योवळी दिगंबर गिरगे याची जनावरे शेतात आल्याचे फिर्यादीच्‍या निदर्शनास आले. फिर्यादी शेतात जनावरे आल्याचा जाब विचारत असतांना आरोपी दिगंबर याने त्‍यांना शिवीगाळ केली. आवाज ऐकुन आरोपीची मुले  संदीप आणि बाळासाहब गिरगे असे दोघे तेथे आले. त्‍यांनी फिर्यादीला शिवीगाळ करुन कुऱ्हाडीच्‍या लाकडी दांड्याने बेदम मारहाण करुन जखमी केले.या  प्रकरणात पैठण पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.