नांदेड जिल्ह्यांत पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला

विष्णुपुरी प्रकल्पाची सात दरवाजे उघडले

Image

पूर परिस्थितीतून नागरिकांनासावरण्यासाठी जिल्हा प्रशासन घटना स्थळांवर दक्ष

मुदखेड येथे इजळी पुलावर सिता नदीच्या पुरात अडकलेल्या शर्मा यांना सूखरूप बाहेर काढण्यात यश

किनवट येथे पैनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पूर

किनवट येथील पैनगंगेच्या पुरामुळे दोनशे कुटुंबाचे स्थलांतर

नांदेड ,१३ जुलै /प्रतिनिधी :- नांदेड जिल्ह्यात आज रोजी सकाळी 8.20 पर्यंत गत 24 तासात सरासरी 118 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकुण 510.30 मिमी एवढा पाऊस आजवर झाला आहे. 12 जुलै रोजी जिल्ह्यात 100 मिमी पेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यापेक्षा काही प्रमाणात अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्व नदी-नाले पूर्ण क्षमतेने वाहत आहेत.

आज दिवसभरही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचण्यासह जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क हा तुटलेला आहे. किनवट येथे पैनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने तेथील दोनशे लोकांना सकाळी 11 पर्यंत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते.भोकर तालुक्यातील सिताराम नाईक तांडा येथील नाल्यामध्ये चरण रामधन राठोड वय 45 वर्षे वाहून गेल्याने मृत अवस्थेत आढळून आले. ते सकाळी शौचास गेले होते असे त्याच्या कुटुंबाकडून सांगण्यात आले आहे.

May be an image of 9 people, people standing, body of water and text that says "5 ATTIfURE Latitude: 9.620558 Longitude: Longitude:78.197387 197387 Elevation: 317.64±19 m Accuracy: m Azimuth: 315° (NW) Pitch:-7.4° .9°) 07-13-2022 11:46 Note: किनवट (k Û AngleCam"

भोकर तालुक्यातील मुदखेड येथेही सिता नदीला पूर आल्याने इजळी येथे दोघेजण अडकून पडली होती. दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले.मुदखेड तालुक्यातील सिता नदीला पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुदखेड जवळील इजळी येथे पुलावर काल दि. 12 जुलै रोजी दोघेजण अडकून पडले होते. बारड येथील सावळा शिंदे आणि रेल्वे कर्मचारी दिपक शर्मा ही अडकून पडलेल्या दोघांची नावे आहेत. ही माहिती मिळताच तात्काळ महसूल यंत्रणा घटनास्थळावर दाखल झाली. यातील बारडचा सावळा शिंदे स्वत: यातून बाहेर पडला. दिपक शर्मा यांना एसडीआरएफच्या रेस्क्यू टीमने पुरातून सुखरूप बाहेर काढले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, भोकरचे उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र खंदारे, तहसिलदार, पीएसआय सोनटक्के, आदी उपस्थित होते.

May be an image of tree and road

बिलोली-धर्माबाद रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येसगी येथील पूल वाढत्या पाण्यामुळे वाहतुकीसाठी दुपार पासून बंद ठेवण्यात आला आहे. मन्याड नदीला पूर आलेला आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून नायगाव व बिलोलीमध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणा लक्ष ठेऊन आहे.

May be an image of road

उमरी तालुक्यात 2 जनावरे, लोहा तालुक्यात 5 जनावरे, सहा घरांची पडजड, देगलूर तालुक्यात दोन गावांचा संपर्क तुटला आहे. कंधार तालुक्यात 2 जनावरे पुरात वाहून मयत झाली तर दोन घरांची पडझड  झाली. भोकर तालुक्यात दहा गावांचा संपर्क तुटला. यात नांदा बु, जामदरी, धावरी बु. व धावरी खु, धानोरा, बोरगाव, जाकापूर, हस्सापुर, दिवशी बु, दिवशी खु या गावांचा संपर्क पुलावरून पाणी जात असल्याने तुटला आहे.

May be an image of 7 people, people standing, animal and outdoors

रेणापूर येथील 15 कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थलांतरीत केले आहे. अर्धापूर येथील मौ. सांगवी खु, मेंढला, शेलगाव बु, शेलगाव खु, कोंढा व भोगाव या गावाचा संपर्क तुटलेला आहे. एक जनावर मयत झाले आहे. हदगाव तालुक्यात पुलावरून पाणी जात असल्याने मौ. हरडफ, जगापूर ते जगापूर पाटी, टाकळगाव यांचा संपर्क तुटला आहे. वाळकी खु व वाळकी बु मधील लाखाडी नदी पुलावरून पाणी जात असल्याने हदगाव ते हिमायतनगर रस्ता वाहतुकीस बंद पडला आहे.

May be an image of 4 people, people sitting, people standing and outdoors

तामसा-भोकर मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद असून वाहतूक बंद आहे. वाळकी बु. गावाच्याकडेला पुराचे पाणी आले आहे. नांदेड येथे पुलावरून पाणी जात असल्याने एकदरा, चिखली बु, कासारखेडा, राहेगाव, धनगरवाडी या गावांचा संपर्क तुटला. आसना-पासदगाव पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद आहे. मौ. धनेगाव येथे एक, आलेगाव येथे एक, ढोकी येथे एक, पोखर्णी येथे एक, लिंबगाव येथे एक, पिंपळगाव येथे एक, पिंपरीमहिपाल येथे दोन, एकदरा येथे सात, पिंपळगाव निमजी येथे एक अशी एकुण 16 घरांची पडझड झाली आहे. भायेगाव येथे एक म्हैस विजेची तार पडून मयत आहे. अतिवृष्टीमुळे पार्डी येथे तीन व हिमायतनगर येथे एक घर पडझड आहे.

May be an image of 2 people, people standing, body of water and road

संपूर्ण जिल्हा प्रशासनाला दक्षतेचा इशारा दिला असून 24 तास सहकारी अधिकारी जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी आपली अधिकाधिक काळजी घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

सर्वत्र पावसाने जिल्ह्याच्या 34 प्रकल्पातील पाणी पातळी शंभर टक्क्यांवर

नांदेड जिल्ह्यात व इतरत्र गत तीन दिवसांपासून असलेल्या पावसामुळे लहान-मोठ्या नदी-नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील देगलूर, भोकर, लोहा पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत असलेले सुमारे 34 प्रकल्पातील पाणी पातळी शंभर टक्क्यापेक्षा अधिक झाली आहे. सर्व संबंधितांना पूर परिस्थितीबाबत दक्ष राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.या 34 प्रकल्पांमध्ये देगलूर तालुक्यातील भूतनी हिप्परगा ल.पा. येडूर साठवण तलाव, हानेगाव एक व हानेगाव दोन ल.पा. अंबुलगा ल.पा., मुखेड तालुक्यातील शिरुळ ल.पा. मुखेड ल.पा. सोनपेठवाडी ल.पा. कुंदराळा मध्यम प्रकल्प, बिलोली तालुक्यात दर्यापूर ल.पा., लोहा तालुक्यात सुनेगाव, भोकर तालुक्यात लामकानी ल.पा., धानोरा ल.पा., सावरगाव ल.पा., कोंडदेव ल.पा.,उमरी तालुक्यातील कुदळा मध्यम प्रकल्प, कारला, गोरठा, सोमठाना ल.पा., हदगाव तालुक्यातील चाभरा ल.पा., पिंपराळा, केदारनाथ, घोगरी, येवली, चिकाळा, धनिकवाडी, लोहामांडवा ल.पा. समावेश आहे. हिमायतनगर तालुक्यात सुना, पवना ल.पा.,कंधार तालुक्यात पानशेवडी ल.पा., घागरदरा, भेंडीवाडी सा.त. पेठवडज मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे.

संभाव्य पुराच्या स्थितीला हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची निर्मल जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

पोचमपाड धरणाची दोन्ही जिल्हाधिकारी व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

May be an image of 10 people, people sitting and people standing

नांदेड जिल्ह्यात व गोदावरीच्या पात्रात गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नांदेड जिल्ह्याच्या भौगोलिक स्थितीला लक्षात घेता गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली तर स्वाभाविकच शेजारील गावात या पाण्याच्या पुराचा फटका बसू शकतो. गोदावरी नदीवरील बंधारे, सध्या त्यातील पाणीसाठा व येत्या तीन-एक दिवसात होणारी परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या पोचमपाड धरणाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत निर्मलचे जिल्हाधिकारी मुशर्रफ फारुकी, नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता बी. के. शेटे, कार्यकारी अभियंता अशिष चौगले व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

May be an image of 5 people, people sitting, people standing and indoor

विष्णुपूरी प्रकल्पात पाण्याचा येवा लक्षात घेता हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत आहे. मात्र संभाव्य परिस्थिती लक्षात घेता व्यवस्थापनाच्या दृष्टिकोणातून पाटबंधारे विभागाने विष्णुपुरीचे सात दरवाजे उघडले आहेत. या प्रकल्पात दिग्रस बंधारा, पुर्णा नदी व मुक्त पाणलोटातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे पाणी सोडण्यात येत आहे. सोडण्यात येणारे हे पाणी बळेगाव, बाभळी प्रकल्पाद्वारे पोचमपाड प्रकल्पात जाते. पोचमपाड प्रकल्पाचे दरवाजे जर बंद ठेवले तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम गोदावरीतील पाणीसाठ्यावर होऊन मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीत पाण्याचा फुगवटा निर्माण होतो. यामुळे स्वाभाविकच नदीकाठचे गावे पाण्याखाली येतात. पुराचा हा संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्मल जिल्हाधिकाऱ्यांसह पोचमपाड धरणावर अंतरराज्य पूर समन्वयाबाबतची आढावा बैठक घेऊन नियोजन केले. तेलंगणा पाटबंधारे विभाग व निर्मल जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पोचमपाड धरणाचेही दरवाजे उघडण्यात आले असून संभाव्य पुराच्या धोक्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 118 मि.मी. पाऊस

नांदेड जिल्ह्यात बुधवार 13 जुलै 2022 रोजी सकाळी 8.20 वाजता संपलेल्या गत 24 तासात सरासरी 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 510.30 मिलीमीटर पाऊस झाला आहे.जिल्ह्यात बुधवार 13 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 124.90 (528.30) बिलोली-127.90 (513.80), मुखेड- 79.30 (480.30), कंधार-98.60 (547.20), लोहा-121.80 (505.90), हदगाव-164.50 (459.40), भोकर- 167.30 (552.10), देगलूर-58.20 (454.70), किनवट-100.30 (503.40), मुदखेड- 152.40 (639.50), हिमायतनगर-183.10 (668.20), माहूर- 86.40 (420.10), धर्माबाद-109.50 (510.80), उमरी- 151.30 (593.00), अर्धापूर- 115.80 (490.), नायगाव- 136.20 (451.70) मिलीमीटर आहे.

किनवट येथील पैनगंगेच्या पुरामुळे दोनशे कुटुंबाचे स्थलांतर

Image

किनवट परिसरात पैनगंगा नदीला पूर आला आहे. पुर्ण क्षमतेने नदी भरुन वाहत आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीत येणारे पाण्याचे प्रमाण लक्षात घेता स्वाभाविकच पैनगंगेचे पाणी किनवटच्या नदी जवळील सखल भागात घुसले आहे. या भागातील 200 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले असून प्रशासनातर्फे या लोकांना अन्नाची पाकिटे व इतर व्यवस्था केली जात असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किर्ती कुमार पुजार यांनी दिली. आज सकाळ पासून नांदेड-किनवट हा मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झालेला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.