कामाला लागा; निवडणुकांसाठी शरद पवारांचे आदेश

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सक्रीय सहभाग नोंदवण्याची ग्वाही

मुंबई ,१३ जुलै /प्रतिनिधी :-मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार यांनी स्वतः सूत्र हातात घेतली असून, कोणता पक्ष सोबत येईल, नाही येईल याचा विचार न करता कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मुंबईतल्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी वरील आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ उपस्थित होते. मुसळधार पावसातही मोठ्या संख्येने पदाधिकारी हजर होते.

May be an image of 2 people, people standing and indoor

शिवसेना आणि राष्ट्रवादीची शक्ती एकत्र आल्यास चित्रं वेगळे दिसेल असे वक्तव्य पवारांनी काल केले होते आणि आज मात्र त्यांनी कार्यकर्त्यांना कोणावरही विसंबून न रहाता महापालिका निवडणुकीसाठी सज्ज रहाण्यास सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे घेण्यात आली. या बैठकीला शरद पवार , प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, छगन भुजबळ, खासदार सुप्रियाताई सुळे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव यांनी मार्गदर्शन केले. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उपस्थिती दर्शवली.शेवटच्या कार्यकर्त्याला शक्ती देऊन त्याची प्रतिष्ठा कशी राखली जाईल, हा प्रयत्न करण्यासाठी काल राज्यव्यापी आणि आज मुंबई विभागीय कार्यकारिणीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापली मते दोन्ही दिवसाच्या बैठकीत मांडली आहेत. यापुढे आपल्याला एकच काम करायचे आहे ते म्हणजे संघटना वाढवून ती बळकट करायची आहे, अशी भूमिका शरद पवार यांनी बैठकीत मांडली. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सक्रीय सहभाग नोंदवण्याची ग्वाही त्यांनी दिली.

May be an image of 11 people and indoor

जयंत पाटील यांनी बैठकीला संबोधित करताना सांगितले की, “मुंबईत आपला पक्ष वाढविण्यासाठी अनेक वर्षांपासून आपण प्रयत्न करतोय. पक्षनिष्ठा ठेवून काम करणारे बोरिवलीपासून कुलाब्यापर्यंत प्रयत्न करत आहेत. राजकारणाच्या दृष्टीने महाराष्ट्रात मुंबई शहर हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण शहरात स्वतंत्र फादर बॉडी तयार केली आहे. आपण अधिक सतर्कपणे प्रत्येक वॉर्डमध्ये पक्षाचा उमेदवार देणे गरजेचे आहे. यासाठी आपल्याला सातत्याने लोकांमध्ये जाऊन संवाद साधला पाहिजे. यासाठी सर्वांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा. याद्वारे पक्षाची भूमिका प्रकर्षाने मांडण्यास मदत होईल.

May be an image of 5 people, people standing, indoor and text that says "महाराष्ट्र प्रत 1"

“मुंबई शहरात पाणी, मीटर, सांडपाण्याचा निचरा असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे आपल्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ते सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे, अशी सूचना छगन भुजबळ यांनी केली. आज गुरुपौर्णिमा आहे. या दिवशी सर्वांनी एकच निर्धार करा आणि पवार यांना गुरूदक्षिणा म्हणून मुंबई शहरात आपल्या नगरसेवकांची संख्या वाढवून दाखवा, असे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

May be an image of 9 people, people standing, indoor and text that says "महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी"

यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, “पक्षाचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केलेल्या कामाची दखल संपूर्ण देशाने घेतली. नवाब भाई यांनी केंद्र सरकारची केलेली पोलखोल अतिशय उल्लेखनीय होती. त्यांचा आवाज दाबण्यासाठी केंद्राने त्यांना निष्कारण त्रास देण्याचा डाव आखला आहे. आपण विरोधात असतो तेव्हा काम सोपे असते. सत्ताधारी हे नेहमीच नवनवीन मुद्दे देत असतात. त्यावर आवाज उठवणे आपली जबाबदारी आहे. यासाठी कोणताही मुहूर्त लागत नाही. बेरोजगारी, महागाई अशा सर्व मुद्द्यांवर लोकशाहीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून त्याविरोधात आवाज उठवा. ”

May be an image of 3 people and indoor

मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव यांनी पक्षाच्या मुंबई जिल्हा व तालुकानिहाय वस्तुस्थितीचा आढावा या बैठकीत पक्षश्रेष्ठींसमोर मांडला. मुंबईची निवडणूक आली की प्रत्येक तालुक्यात उमेदवार दिला जातो. पण त्या वॉर्डमध्ये असलेले प्रश्न अत्यंत गंभीर आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे. यात नवीन सहकारी एखाद्या वॉर्डमध्ये निवडणूक लढणार असेल तर त्यांना योग्य ते सहकार्य पक्षाच्यावतीने मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करत मुंबईची कार्यकारणी ही १६०-१७० सदस्यांची आहे. त्यांच्यावर प्रत्येकी एका वॉर्डची जबाबदारी द्यायला हवी, अशी सूचना राखी जाधव यांनी केली. तसेच निवडणुकीपर्यंत मर्यादित काम आम्हाला करायचे नाही तर आम्हाला संघटनेचे काम करायचे आहे. संघटना कशी वाढेल यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे, असे राखी जाधव यांनी सांगितले.

No photo description available.

या बैठकीला कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण, माजी खासदार माजीद मेमन, राष्ट्रीय सचिव नरेंद्र वर्मा, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, मुंबई विभागीय महिलाध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले, मुंबई विभागीय सामाजिक न्याय सेल अध्यक्ष सुनील शिंदे, मुंबई विभागीय अल्पसंख्याक अध्यक्ष सोहेल सुभेदार, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष विजय वाडकर, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश परब, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ, माजी नगरसेवक अजित रावराणे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.