भारतातील कोविडचे रुग्ण बरे होण्याचा आकडा 10 लाखांच्या पार
रुग्ण बरे होण्याचा दर राष्ट्रीय सरासरी 64.44% पेक्षा अधिक
भारतात एकूण 1.82 कोटी नमुन्यांची चाचणी
नवी दिल्ली, 30 जुलै 2020
भारतात कोविड-19 च्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या 10 लाखांहून अधिक झाल्याची महत्वपूर्ण नोंद करण्यात आली आहे.
डॉक्टर, परिचारिका आणि सर्व आघाडीच्या आरोग्यसेवा कामगारांच्या कर्तव्यनिष्ठा आणि नि: स्वार्थ त्यागामुळेच कोविड -19 रूग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. 1 जून ला कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा आकडा 1 लाख होता आणि केंद्र व राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या कोविड -19 व्यवस्थापन योजनेच्या समन्वयित अंमलबजावणीमुळेच यात सातत्याने वाढ होत आज हा आकडा दहा लाखाहून अधिक झाला आहे.
एकत्रीत पद्धतीने प्रभावी प्रतिबंधित धोरण, जलद चाचणी आणि प्रमाणित क्लिनिकल व्यवस्थापन प्रोटोकॉलची यशस्वी अंमलबजावणीच्या आधारेच सलग सातव्या दिवशी कोविडचे 30,000 हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोविडचे 15,000 रुग्ण बरे झाले होते; रुग्ण बरे होण्याच्या दैनंदिन सरासरी प्रमाणात निरंतर वृद्धी होऊन जुलै च्या शेवटच्या आठवड्यात सुमारे 35,000 रुग्ण बरे झाले.
गेल्या 24 तासात 32,553 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिल्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 10,20,582 वर पोहोचला आहे. कोविड-19 रुग्णांचा बरे होण्याचा दर आता 64.44 % झाला आहे. बरे झालेले रूग्ण आणि सक्रिय कोविड -19 रुग्णांमधील अंतर सध्या 4,92,340 इतके आहे. या आकडेवारीनुसार बरे झालेलं रुग्ण हे सक्रीय रुग्णांच्या 1.9 पट आहेत ( सर्व 5,28,242 सक्रीय रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत)
अविरत क्लिनिकल व्यवस्थापनासाठी परवडणार्या रुग्णालयाच्या पायाभूत सुविधा वृद्धिंगत करण्यासाठी राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांनी स्थानिक पातळीवर अनेक उपाययोजना केल्या आहेत. 16 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील मृत्यू दर हा राष्ट्रीय सरासरी मृत्यू दरापेक्षा कमी आहे हे त्याचेच यश आहे.
सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या एकत्रित प्रयत्नांमुळे रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये वृद्धी होऊन तसेच जलद चाचणी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे कोविड-19 च्या रूग्णांची लवकर ओळख पटवून त्यांची जलद गतीने चाचणी घेण्यात आल्यामुळे मृत्यू दर कमी होण्यात मदत झाली आहे. गंभीर रुग्ण आणि अति-जोखीम असणाऱ्या रुग्णांची काळजी घेण्यासोबतच प्रतिबंधित धोरणाचे संपूर्ण लक्ष जलद शोध आणि अलगिकरणावर केंद्रित केले आहे. यामुळे हे सुनिश्चित झाले आहे की, जागतिक सरासरी 4% मृत्यू दराच्या तुलनेत भारतातील मृत्यू दर 2.21% आहे. 24 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी सीएफआर आहे आणि 8 राज्ये / केंद्र शासित प्रदेशत 1% च्या खाली सीएफआरची नोंद झाली आहे.
प्रतिदशलक्ष लोकांमागे चाचण्यांची संख्या वाढून 13,181 वर पोहोचली
कोविड-19 बाधित रुग्णांची लवकर ओळख पटावी आणि त्यांचे अलगीकरण सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या एकत्रित आणि केंद्रित प्रयत्नांमुळे देशभरात जलद गतीने चाचण्या घेण्यात येत आहेत. आयसीएमआरच्या विकसित होणार्या चाचणी धोरणामुळे संपूर्ण भारतातील चाचणी नेटवर्क विस्तृत झाले आहे.
गेल्या 24 तासात 4,46,642 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेतलेल्या सरासरी 2.4 लाख दैनंदिन चाचण्यांमध्ये वृद्धी होऊन जुलैच्या शेवटच्या आठवड्यात 4.68 लाखांपेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या.

देशातील 1321 प्रयोगशाळांसह चाचणी प्रयोगशाळेचे जाळे सातत्याने बळकट केले जात आहे.सध्या 907 सरकारी प्रयोगशाळा आणि 414 खासगी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. या मध्ये खालील प्रयोगशाळा समाविष्ट आहेत :
- रिअल टाइम रॅपिड टेस्ट पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा 676 : (शासकीय : 412 + खासगी : 264)
- ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : 541 (शासकीय : 465 + खासगी : 76)
- सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा 104: (शासकीय : 30 + खासगी 74)
वर्धित चाचणी पायाभूत सुविधांमुळे 88 लाख चाचण्यांपासून (1 जुलै 2020) 1.82 कोटी चाचण्यांपर्यंत (30 जुलै 2020) वाढ झाली आहे.
प्रतिदशलक्ष लोकांमागे चाचण्यांची संख्या वाढून 13,181 वर पोहोचली आहे.

केंद्र सरकारच्या “चाचणी, मागोवा आणि उपचार” (“टेस्ट, ट्रॅक अँड ट्रीट”) या धोरणानुसार, देशात मोठ्या प्रमाणात चाचणी केल्याने संपूर्ण देशातील कोरोना बाधित रुग्णांच्या दरात घट झाली आहे. सध्या 21 राज्ये / केंद्र शासित प्रदेशात चाचणी केलेल्या लोकांपैकी 10% पेक्षा कमी लोकांचा अहवाल कोरोना बाधित असल्याचा येत आहे.
