सोनिया गांधींना ईडीची नवीन नोटीस; चौकशीसाठी २१ जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले

नवी दिल्ली,११ जुलै /प्रतिनिधी :- सोनिया गांधी यांना २१ जुलै रोजी ईडीच्या कार्यालयात हजर होण्याची नवीन नोटीस अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बजावली आहे. या प्रकरणात सोनिया गांधी यांचे पुत्र राहुल गांधी यांची याआधी अनेकदा चौकशी केली आहे.

मागील काही दिवसांपासून सोनिया गांधी आजारी होत्या. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी ईडी चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ वाढवून घेतली होती. आता ईडीने नवीन नोटीस बजावली आहे.

काय आहे प्रकरण

माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी ‘नॅशनल हेराल्ड’ हे वर्तमानपत्र सुरू केले होते. हे काँग्रेसचं मुखपत्र समजलं जायचं. काही काळातच हे वर्तमानपत्र बंद पडले. मात्र २०१२ मध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांच्या ‘यंग इंडिया’ या कंपनीने या वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतले. मात्र हे सुरु करण्यात आलं नव्हतं. हे हक्क घेताना १६०० कोटींची संपत्ती फक्त ५० लाखांत घेतल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. त्या प्रकरणी चौकशी सुरू आहे.