शिवसेनेला खिंडार! ठाण्याचे ६६ नगरसेवक शिंदे गटात

ठाणे : अनेक वर्षे ठाण्यामध्ये एकहाती सत्ता असलेल्या शिवसेनेला सत्ता गेल्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाण्यातील ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. यामुळे ठाण्यामध्ये शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. ठाण्यातील माजी महापौर नरेश मस्के यांच्यासोबत या नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

ठाण्यात एकहाती वर्चस्व असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आता शिवसेनेला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीआधीच ठाण्यातील ६६ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याने शिवसेनेपुढील अडचणी वाढल्या आहेत.

ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६७ नगरसेवक असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे ३४, भाजपकडे २३, काँग्रेसकडे ३ आणि एमआयएमकडे २ नगरसेवक आहेत. ठाणे महापालिकेचा कार्यकाळ संपला असून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यात ठाणे महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.