मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रबोधनकार आणि बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना वंदन

मुंबई ,५ जुलै /प्रतिनिधी :- प्रबोधनकार केशव ठाकरे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंदन केले.

आज दादर येथील संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भेट दिली. यावेळी आमदार सदा सरवणकर, सहायक आयुक्त प्रशांत सकपाळ, दालनाच्या व्यवस्थापक निलिमा कामत उपस्थित होत्या.

या दालनात संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास, लढा, आंदोलन, मोर्चे, महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ कशी रोवली, कर्नाटक सीमाप्रश्न, शाहीर, हुतात्मे, राजकीय, समाजकारणी, लोकनेते यांची माहिती आणि छायाचित्र असलेल्या दालनास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भेट दिली.

दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘अ’ छायाचित्र दालनातील महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा लढवय्या शिलेदार म्हणून उल्लेख असलेल्या प्रबोधनकार केशव ठाकरे यांच्या छायाचित्रास आणि मावळा मधील बाळासाहेब ठाकरे यांची प्रसिद्ध झालेली व्यंगचित्रे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रासही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी वंदन केले आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकास भेट

Image

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साहित्यिक आणि समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या शिवाजी पार्क येथील राष्ट्रीय स्मारकास भेट दिली.

Image

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी वि.दा.सावरकरांच्या जीवनपटावर आधारित साहित्य, सावरकरांची अर्धाकृती मूर्ती भेट म्हणून दिली. यावेळी आमदार सदा सरवणकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर उपस्थित होते.