भक्कम बहुमताने आम्ही विजयी होऊच-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

मुंबई : ” आमच्या युतीने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली, येणाऱ्या बहुमतचाचणीतही आम्ही भक्कम बहुमताने विजयी होऊच ” असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. भाजप – शिंदे गट युतीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीत १६४ मते मिळवून विजय मिळवला आहे. भाजपचे दोन आमदार त्यांच्या प्रकृतीमुळे या निवडणुकीस उपस्थित राहू शकले नाहीत पण सोमवारी होणाऱ्या बहुमत चाचणीला आमच्याकडे १६६ जणांचे पाठबळ असेल त्यामुळे आमचे सरकार यशस्वी होईलच याबद्दल काहीच शंका नाही.
 
 
आरे कारशेडला विरोध करणारेच मुंबईकरांच्या मुळावर
 
मेट्रो कारशेड आरे मध्ये होण्याने कुठलीही पर्यावरणाची हानी होणार नाहीये , जी हानी होणार आहे ती मेट्रो सुरु झाल्यावर जे प्रदूषण कमी होणार आहे त्यातून लवकरच भरून निघेल, हे सर्वोच्च न्यायालयातही सिद्ध झाले असल्याचा दावा करत जे या कारशेडला विरोध करत आहेत तेच मुंबईकरांच्या मुळावर उठले आहेत असा थेट आरोप फडणवीसांनी केला. आरेला ज्या सच्च्या पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे त्यांचे गैरसमज आम्ही लवकरच दूर करू. ही मेट्रो लवकर सुरु होणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
मागल्या सरकारचे निर्णय सरसकट रद्द करणार नाही
 
मागल्या सरकारने जे निर्णय घेतले आहेत ते त्या सरकरचे निर्णय आहेत म्हणून रद्द करणार नाही, जे निर्णय कुठल्याही अभ्यासाशिवाय, कुहेतूने , भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने घेतले आहेत तेवढेच निर्णय अभ्यासपूर्ण पद्धतीने रद्द केले जातील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केले. आधीच्या सरकारचे जे चांगले निर्णय असतील ते नक्कीच कायम ठेवू असेही त्यांनी सांगितले.
 
 
आमचे प्राधान्य इम्पिरिअल डेटाला
 
ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळवण्यासाठी आमच्या सरकारने जोरदार प्रयत्न सुरु केले असून आमचे प्राधान्य हे लवकरात लवकर इम्पिरिअल डेटा सादर करण्याला असेल असे फडणवीस म्हणाले. लवकरात लवकर इम्पिरिअल डेटा तयार करून ट्रिपल टेस्ट पूर्ण करून सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे फडणवीसांनी स्पष्ट केले.