विनायक साखर कारखाना भाडेतत्वावर ; मात्र, कारखाना सुरू करण्यासाठी अद्याप कोणत्याही हालचाली नाही

कारखाना सुरू होणार की नाही याविषयी साशंकता

जफर ए.खान 

वैजापूर ,२ जुलै :- गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला व थकीत कर्जापोटी राज्य सहकारी बँकेने जप्त केलेला तालुक्यातील विनायक सहकारी साखर कारखाना जयहिंद शुगर लि.या कंपनीस भाडेतत्वावर चालविण्यास देण्यात आला आहे. मात्र, कारखाना सुरू करण्यासाठी अद्याप कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत त्यामुळे हा कारखाना पुन्हा सुरू होतो की नाही याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांची मात्र याविषयी उदासीनता दिसून येत आहे.
तालुक्याचे भूमिपुत्र तथा राज्याचे माजी सहकार मंत्री स्व.विनायकराव पाटील यांच्या कल्पनेतून साकार झालेला विनायक सहकारी साखर कारखाना गेल्या 20 – 21 वर्षांपासून बंद अवस्थेत पडलेला आहे. कारखान्याकडे थकीत असलेल्या 57 कोटी 23 लाख 87 हजार रुपयांच्या थकबाकीपोटी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने या कारखान्याची मालमत्ता जप्त केलेली आहे. कारखान्याकडे इतर मोठ्याप्रमाणात देणी बाकी आहे. 31 मार्च 2014 अखेर कामगारांची पगाराची रक्कम 1 कोटी 69 लाख 59 हजार 467 रुपये व प्रॉव्हिडंट फंडचे 4 कोटी 10 लाख 28 हजार 481 रुपये असे एकूण 5 कोटी 79 लाख 87 हजार 948 रुपये कामगारांचे देणे आहे.त्याचप्रमाणे एम.एस.ई.बी.चे वीज बिलाचे 1 कोटी 12 लाख 9 हजार 626 रुपये व जमिनीचे महसूल कर 54 हजार रुपये याप्रमाणे कारखान्याकडे देणी आहे.थकीत असलेल्या कर्जाच्या वसुलीपोटी राज्य सहकारी बँकेने निविदा काढून जिल्ह्यातील विनायक व गंगापूर हे दोन्ही साखर कारखाने माने-देशमुख यांच्या जयहिंद शुगर लि. या कंपनीस भाडेतत्वावर चालविण्यास दिले आहे.जयहिंद शुगर लि.या कंपनीने गंगापूर साखर कारखाना सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी जाहिरात ही दिली आहे. मात्र विनायक साखर कारखाना सुरू करण्यासाठी अद्याप कोणत्याही हालचाली सुरू केलेल्या नाहीत त्यामुळे हा कारखाना सुरू होतो की नाही याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. 
तालुक्यात सिंचन क्षेत्र वाढले असून ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. परंतू हक्काचा विनायक साखर कारखाना बंद असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडचण येत आहे. शेजारच्या नगर – नाशिक जिल्ह्यातील करखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असून तालुक्यातील ऊसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. तर बंद अवस्थेत असलेला विनायक कारखाना सुरू करण्याऐवजी तालुक्यात नवीन साखर कारखाना उभारण्याचा काही मंडळींचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू आहे.