बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या रिले मशालीचे महाराष्ट्रात जोरदार स्वागत

नागपूरमध्ये प्रसिद्ध झिरो माईल येथे तर पुण्यात ऐतिहासिक शनिवारवाडा आणि दगडूशेठ गणपती मंदिराला दिली भेट

बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल रिलेचे मुंबईत स्वागत

मुंबई ,नागपूर/पुणे ,२ जुलै /प्रतिनिधी :- पहिली बुद्धिबळ ऑलिम्पियाड टॉर्च रिले आज महाराष्ट्रात पोहोचली आणि नागपूर आणि पुणे या प्रमुख ठिकाणांवरून मशालीचा प्रवास झाला. मशाल संध्याकाळी 6.30 वाजता मुंबईत पोहोचेल तेथून ती गोव्याकडे रवाना होईल. भारत स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत असताना, बुद्धिबळ ऑलिम्पियाडची मशाल देशातील 75 शहरांमध्ये नेली जात आहे. 19 जून रोजी नवी दिल्ली येथे मशाल  रिलेच्या ऐतिहासिक आरंभ  दिनी, फिडे या  आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संस्थेचे  अध्यक्ष आर्कडी ड्वोरकोविच यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे ही मशाल दिली त्यानंतर त्यांनी ती भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्या हातात  सुपूर्द केली होती.

भारत – प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशालीचा मान

यावर्षी, प्रथमच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ, FIDE  ने बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशालची सुरुवात केली आहे, जी ऑलिम्पिक परंपरेचा भाग आहे, मात्र, बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आजपर्यंत केली गेली नाही. यापुढे दर दोन वर्षांनी जेव्हा बुद्धिबळ ऑलिम्पियाड होईल तेव्हा भारतातून यजमान देशाकडे मशाल निघेल.

28 जुलै ते 10 ऑगस्ट 2022 या कालावधीत चेन्नई येथे 44 वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड होणार आहे. 1927 पासून आयोजित करण्यात आलेल्या या मानाच्या स्पर्धेचे आयोजन भारतात प्रथमच तर आशियामध्ये 30 वर्षांनंतर केले जात आहे.

बुद्धिबळ ऑलिम्पियाड टॉर्च रिले झिरो माईलनागपूर येथे

आज सकाळी राज्याची उपराजधानी नागपुरात पहिल्यावहिल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड रिले मशालीचे आगमन झाले. शहरातील प्रसिद्ध झिरो माईल येथे बुद्धिबळ मशाल रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रँड मास्टर रौनक साधवानी, दिव्या देशमुख संकल्प गुप्ता यांच्यासह नागपूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, एनसीसी कॅडेट, क्रीडा प्रेमी  उपस्थित होते. यावेळी सर्व ग्रँड मास्टरचे स्वागत उपस्थित अधिकाऱ्यांनी केले.

नंतर रॅली नागपूर शहरातील प्रमुख चौकातून मार्गस्थ झाली आणि नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेण्यात आली. तिथून ती पुण्यात पोहचली.

बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल पोहोचली पुणे‘ शहरात

पहिल्या चेस ऑलिम्पियाड मशालीचे आज पुण्यात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ढोल ताशाच्या निनादात मशालीची मिरवणूकही काढण्यात आली.

पुण्यातील अमनोरा टाऊनशिप मध्ये झालेल्या या शानदार समारंभासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, ग्रॅण्ड मास्टर अभिजित कुंटे, वुमन ग्रॅण्ड मास्टर ईशा करवडे, खेलरत्न पुरस्कार विजेती नेमबाज अंजली भागवत  यांच्यासह राज्य बुद्धिबळ संघटनेचे आजी माजी पदाधिकारी, शालेय विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. चेस ऑलिम्पियाड च्या निमित्तानं भारतात बुद्धिबळ या खेळाची लोकप्रियता वाढावी आणि या क्रीडा प्रकारात नवी क्रांती घडावी अशी अपेक्षा यावेळी अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केली.

गुप्ता यांच्या हस्ते यावेळी ऑलिम्पियाड ज्योत ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. नंतर ज्योत यात्रेने शनिवारवाडा आणि दगडूशेठ गणपती मंदिरात भेट दिली. त्यानंतर ही ज्योत मुंबईकडे रवाना झाली.

मुंबई येथील कार्यक्रमाविषयी अद्ययावत माहिती कार्यक्रमानंतर लगेच प्रकाशित करण्यात येईल.

बुद्धिबळ ऑलिम्पिक मशाल रॅली

या ऐतिहासिक मशाल रॅलीचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी  स्टेडियमवर करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त, या रिलेमध्ये एकूण 75 शहरांचा समावेश असेल.

19 जून रोजी नवी दिल्ली येथे मशाल रिलेच्या ऐतिहासिक आरंभ दिनी, फिडे या  आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संस्थेचे  अध्यक्ष आर्कडी ड्वोरकोविच यांनी माननीय पंतप्रधान मोदी यांच्याकडे ही मशाल दिली त्यानंतर  त्यांनी ती भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्या हातात  सुपूर्द केली.ऐतिहासिक शुभारंभानंतर , मशालीने  राष्ट्रीय राजधानीतील लाल किल्ला, धरमशाला येथील एचपीसीए, अमृतसरमधील अटारी बॉर्डर, आग्रा येथील ताजमहाल आणि लखनौमधील विधानसभेसह ऐतिहासिक प्रतिष्ठा लाभलेल्या  ठिकाणी प्रवास केला.

प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच, भारत 44 व्या फिडे  बुद्धिबळ ऑलिम्पियाडचा केवळ आयोजकच नाही तर 1927 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच फिडे द्वारे स्थापित  मशाल  रिलेची सुरुवात करणारा पहिला देश आहे.आता दर दोन वर्षांनी जेव्हा बुद्धिबळ ऑलिम्पियाड होईल तेव्हा भारतातून यजमान देशाकडे मशाल निघेल.

स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असल्यामुळे 44 व्या फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत 20 खेळाडूंना स्पर्धेत  उतरवणार आहे भारताचा हा  आतापर्यंतचा सर्वात मोठा चमू आहे. भारत खुल्या आणि महिला गटात प्रत्येकी 2 संघ उतरवण्यासाठी पात्र  आहे. 188 देशांमधून  2000 हून अधिक स्पर्धक या स्पर्धेत प्रतिनिधित्व करतील, बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या इतिहासातील ही सर्वोच्च संख्या आहे. 28 जुलै ते 10 ऑगस्ट 2022 या कालावधीत चेन्नई येथे 44 वी फिडे बुद्धिबळ  ऑलिम्पियाड होणार आहे.

बुद्धिबळ, जे आज आपल्याला माहित आहे, त्याचे मूळ चतुरंग या भारतीय खेळापासून आहे, जे 6 व्या शतकातील आहे.  पुढील शतकांमध्ये हा खेळ संपूर्ण आशिया आणि युरोपमध्ये पसरला आणि शेवटी 16 व्या शतकाच्या आसपास बुद्धिबळ म्हणून ओळखला जाणारा हा खेळ विकसित झाला.

सरकारच्या पुढाकाराने देशात बुद्धिबळ संस्कृती निर्माण होत आहे: ग्रँड मास्टर अभिजित कुंटे

पहिलीवहिली ऑलिम्पियाड मशाल रिले 19 जून रोजी दिल्लीत सुरू झाल्यानंतर 14 व्या दिवशी महाराष्ट्रात पोहोचली. महाराष्ट्रातील टॉर्च रिलेच्या अंतिम टप्प्यात आज संध्याकाळी 7 वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथील गरवारे क्लबमध्ये भव्य स्वागत करण्यात आले.

मुंबई येथे वानखेडे स्टेडियमवर गरवारे क्लबमध्ये झालेल्या या कार्यक्रमात ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे, अभिजित कुंटे, सौम्या स्वामीनाथन यांच्यासह क्रीडा विभाग, राज्य बुद्धिबळ संघटनेचे अधिकारी, बुद्धिबळाचे चाहते आणि नवोदित बुद्धिबळपटू उपस्थित होते.

या कार्यक्रमाला संबोधित करताना ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यांनी मशाल रिलेची सुरुवात भारतात होत असल्याचा आनंद व्यक्त केला. “बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच टॉर्च रिले सादर करण्यात आली आहे; भारतातून टॉर्च रिलेला सुरुवात झाली याचा आम्हाला खूप आनंद आहे,” असे ग्रँडमास्टर अभिजित कुंटे म्हणाले. शासनाच्या या उपक्रमामुळे देशात बुद्धिबळ संस्कृती निर्माण होत असून मुलांनाही बुद्धिबळ खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळते. देशात अनेक बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत,असे ते पुढे म्हणाले.

महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ परिणय फुके याप्रसंगी म्हणाले की, यापुढे बुद्धीबळ ऑलिम्पियाड जगभर कुठेही होणार असले तरी बुद्धिबळ ऑल्मिपयाड मशाल रिले भारतातून जाईल.

बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशालचे राज्यस्तरीय बुद्धिबळपटूंनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या केंद्रीय संचार ब्युरोने भारतातून बुद्धिबळाचा उगम कसा झाला आणि भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष यावर प्रकाश टाकणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. पायाभूत सुविधांचा विकास, महिला सक्षमीकरण आणि मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांच्या संकल्पनेवर आधारीत कलाकारांनी नुक्कड नाटकही सादर केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल ऐतिहासिक ठिकाणांवर नेण्यात येत आहे. मुंबई येथे गेट वे ऑफ इंडिया या ऐतिहासिक ठिकाणी मशाल नेण्यात आली.

बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल रिले उत्सवाचा भाग म्हणून, 30 नवोदित बुद्धिबळपटूंना आंतरराष्ट्रीय मास्टर्सविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली.मुंबईतील बुद्धिबळ ऑलिम्पियाड टॉर्च रिलेच्या भव्य स्वागत सोहळ्याचा समारोप ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्या हस्ते ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांच्याकडे मशाल सोपवपून झाला. प्रवासाच्या पुढील टप्प्यात ऑलिम्पियाड मशाल रविवारी सकाळी गोव्यात पोहचणार आहे.