शिंदे गटाचा नवा डाव; शिवसेना पक्ष ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू

मुंबई : पक्षात फूट पाडल्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना पक्ष ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.

आमचाच पक्ष हा शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे आता या दाव्यावरून कायदेशीर संघर्ष होणार असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेनेचे काही खासदारही शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे. गोव्यात उपस्थित असलेल्या ५० आमदारांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचा गटनेता म्हणून निवड केली आहे. या शिंदे गटाकडून शिवसेना आमदारांविरोधात नवा डाव टाकला आहे. शिंदे गटाकडून शिवसेनेच्या १६ आमदारांना व्हीप बजावला आहे. या १६ आमदारांनी गोव्यात तातडीने दाखल व्हावे, असा व्हीप जारी केला आहे. व्हीपचे पालन न झाल्यास १६ आमदारांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदे गट आता अधिक आक्रमक झाला आहे. विधीमंडळात आमचाच पक्ष शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. शिंदे गट आता निवडणूक आयोगाकडे धाव घेणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर आणि पक्षावर त्यांच्याकडून दावा करण्यात येणार असल्याचे समजते.