67 कोटींची बनावट बिले प्रकरणी 2 व्यक्तीना औरंगाबाद वस्तू व सेवाकर विभागाच्या अन्वेषण शाखेद्वारे अटक

औरंगाबाद ,३० जून /प्रतिनिधी :- वस्तू व सेवाकर विभागाच्या औरंगाबाद अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत 67 कोटी रुपयांची खरेदीची बोगस बिले वापरुन त्याद्वारे 12 कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिट निर्माण करुन शासनाची फसवणूक करणाऱ्या  दोन व्यक्तींना दि.29 जून 2022 रोजी अटक करण्यात आली.

            फसवणूक व करचोरीच्या विरोधात महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने आक्रमक मोहिम राबवली आहे. सदर मोहिमेचा भाग म्हणून औरंगाबाद येथील ऍल्युमिनियम स्क्रॅपच्या दोन व्यावसायिकांकडे अन्वेषणपर धाडी टाकण्यात आल्या. मे. एस.आर.मेटल आणि मे. डोअर्स वर्ल्ड या दोन फर्मचे मालक अनुक्रमे समीर चौधरी व मनोज व्यास यांना अटक करुन प्रथमवर्ग न्याय दंडधिकारी यांचे समोर हजर करण्यात आले. सदर व्यवसायिकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नाशिक क्षेत्रातील जीएसटी कायद्यांतर्गत अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.

            सदर प्रकरणात मालाची कोणतीही वाहतूक न करता बनावट ई-वे बिल तयार केल्याची बाब देखील वस्तू व सेवाकर विभागाच्या लक्षात आली आहे. या इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळ्याचे अन्वेषण वस्तू व सेवाकर विभागाद्वारे सुरु असून सदर व्यावसायिकांच्या खरेदी व विक्रीच्या व्यवहारांची सखोल तपासणी अन्वेषण विभाग करत आहे.

            वस्तू व सेवाकर विभागाचे अपर राज्यकर आयुक्त श्री. सुभाष एगंडे तसेच राज्यकर सहआयुक्त श्री. जी.श्रीकांत यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली राज्यकर उपायुक्त श्री. रविंद्र जोगदंड, सहायक राज्यकर आयुक्त नितेश भंडारे, सहायक राज्यकर आयुक्त प्रकाश गोपनार तसेच अन्वेषण विभागातील राज्यकर निरीक्षक यांनी सदर करावाईत सहभाग घेतला.

            करचूकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात  येणाऱ्या काळात अशा मोहिम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार असल्याची माहिती व सर्व व्यापाऱ्यांनी वस्तू व सेवा कराचा भरणा शासनाच्या तिजोरीत नियमितपणे करावा असे आवाहन औरंगाबाद विभागाचे राज्यकर सहआयुक्त श्री.जी. श्रीकांत यांनी केले.