अंत पाहू नका, ”जशास तसे उत्तर देऊ”; केसरकरांचा सरकारवर हल्लाबोल

गुवाहाटी : आमच्या भावनेचा अंत पाहू नका, यापुढे ”जशास तसे उत्तर देऊ”. एकनाथ शिंदे हेच आमच्या गटाचे नेते असल्याचा पुनरुच्चार बंडखोर आमदारांच्या वतीने बाजू मांडताना दीपक केसरकर यांनी केला.

फ्लोअर टेस्ट घ्या, त्यावेळी आमची भूमिका मांडू. आज जे काही महाराष्ट्रात सुरू आहे ते इमोशनली ब्लॅकमेलचा प्रकार आहे असेही ते म्हणाले.

भाजप शासित राज्यात आम्हाला संरक्षण मिळत आहे. माझे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत. रात्री १२ वाजताही फडणवीस माझा फोन उचलतात. आज जर आम्ही एकटे पडलो तर त्यांच्याकडे मदत मागितली तर त्यात काय बिघडले. फडणवीसांनी स्वत: हून आम्हाला संरक्षण दिले, असे दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले.

दीपक केसरकर म्हणाले की, राऊतांच्या वक्तव्यामुळे मोदी आणि ठाकरे यांचे संबंध बिघडत आहे. शरद पवारांनी तीन तीन वेळा शिवसेना फोडल्याचा धक्कादायक आरोपही केसरकर यांनी केला.

शिवसेनेचा आमदार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या राष्ट्रवादीच्या पडलेल्या उमेदवाराला ताकत दिली जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना त्यांच्यावर विश्वास होता, पण ते आता शिवसेना संपवत आहेत. सत्ता जाऊ नये म्हणून राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पणाला लावण्यात येत आहे. आम्ही भाजपमध्ये विलिन होणार असे म्हटले जात आहे, पण या अफवा आहेत, असा खुलासाही त्यांनी केला.

महाविकास आघाडीत शिवसेनेचे खच्चीकरण; उदय सामंतांचे गंभीर आरोप

एकनाथ शिंदेंसह अनेक शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्याने सध्या शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. एकापाठोपाठ एक सेनेचे मंत्री शिंदे गटात सामिल होताना दिसत आहेत. त्यातच शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे, राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे देखील गुवाहटीत शिंदे गटात सामिल झाले आहेत. त्यानंतर उदय सामंत यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

उदय सामंत यांचा एक व्हिडीओ एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. “मला एक संभ्रम दूर करायचा आहे. मी शिवसेनेतच आहे. पण बाळासाहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आमच्या घटक पक्षांमुळे वाईट नजर लागली आहे. त्यांच्या वाईट नजरेतून शिवसेनेला बाहेर काढण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांचे समर्थन करण्यासाठी मी गुवाहाटीला आलो आहे. मला पदाधिकाऱ्याना आवाहन करायचे आहे की कोणाच्याही गैरसमजांना बळी पडू नका. मी शिवसेनेत आहे. बाळासाहेबांची आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना टिकली पाहिजे,” असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.