पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या; मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगामाचा आढावा

मुंबई,२८ जून  /प्रतिनिधी :- मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप हंगामाबाबतही गांभीर्याने आढावा घेण्यात आला. राज्यातील पेरण्याची स्थिती समाधानकारक नसल्याची माहिती देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

गेल्यावर्षी राज्यात आजच्या घडीला सरासरी २७० मिलीमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा मात्र केवळ १३४ मिमी. पाऊस झाला आहे. गतवर्षी आजच्या दिवशी पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र खरीपाखालील क्षेत्रापैकी केवळ १३ टक्के (२०.३० लाख हेक्टर) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेणार

कमी पावसामुळे शहरांमध्ये देखील पाणीपुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे उद्या (29 जून) नगर विकास खात्याचा कार्यभार असलेले मंत्री सुभाष देसाई हे सर्व पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून पाणी पुरवठ्याचे नियोजन कसे केले जाणार आहे याबाबत आढावा घेणार आहेत.

राज्यात 496 टँकर्सने पाणीपुरवठा

राज्यात 27 जूनअखेर 610 गावे आणि 1266 वाड्यांना 496 टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय टँकर्सची संख्या 66 तर खाजगी टँकर्सची संख्या 430 इतकी आहे. पावसाला सुरुवात झाल्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत टँकर्सची संख्येत 31 ने तर टचाईग्रस्त गावांच्या संख्येत 24 ने आणि वाड्यावस्त्यांच्या संख्येत 130 ने घट झालेली आहे.

राज्यातील पाणीसाठा

राज्यातील धरणातील एकूण पाणीसाठा 28 जूनअखेर 21.82 टक्के इतका आहे. विभागवार पाणीसाठ्यामध्ये अमरावती विभागातील प्रकल्पात 33.80 टक्के, मराठवाडा विभागात 27.10 टक्के, कोकण विभागात 34.43 टक्के, नागपूर विभागात 26.81 टक्के, नाशिक विभागात 20.02 टक्के, पुणे विभागात 12.35 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.