महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमधील वाघांच्या संख्येत वाढ

२००६ मध्ये १०३ तर २०१८-१९ मध्ये ३१२ वाघांची नोंद; चौथा सविस्तर अहवाल प्रकाशित

नवी दिल्ली, दि.२८ : देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण वाघांची संख्या २ हजार ९६७ इतकी असून महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये ३१२ वाघांची संख्या आहे. चौथ्या अखिल भारतीय वाघ जनगणनाच्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे.

‘जागतिक टायगर दिना’च्या पुर्वसंध्येला केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावेडकर यांनी देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये असणाऱ्या वाघांच्या जनगणनविषयीचा सविस्तर अहवाल आज येथील राष्ट्रीय मीडिया सेंटर येथे प्रकाशित केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘वाघ’ हा जंगलाचा राजा असून निसर्गाचे समतोल राखण्यासाठी जंगलाचा महत्त्वाचा घटक समजला जातो. वाघांची वाढती संख्या पर्यावरणात समतोल असल्याचे दर्शविते. वाघ आणि इतर प्राण्यांची वाढती संख्या हे भारताला जागतिक पटलावर महत्त्वपूर्ण स्थान मिळवून देण्यात भूमिका निभावू शकतात.

भारतामध्ये जैवविविधतेचे आठ टक्के प्रमाण आहे. वृक्ष, निसर्ग, वन्यजीवन वाचवण्याची आणि जतन करण्याची भारतीय संस्कृती आहे. भारतात, जगातील वाघांच्या संख्येच्या ७० टक्के वाघ आहेत. हे एक प्रशंसनिय बाब, असल्याचे श्री.जावडेकर यावेळी म्हणाले.

मानव आणि प्राण्यांचा संघर्ष टाळण्यासाठी जंगलांमध्ये पाणी व चारा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी प्रथमच लिडर सेंसरचा वापर केला जाईल, अशी माहिती श्री जावडेकर यांनी यावेळी दिली.

चौथ्या अखिल भारतीय व्याघ्र अनुमानाचा तपशीलातील महत्त्वाचे मुद्दे

· इतर प्राणी आणि प्रजातींच्या विपुलता निर्देशांक दर्शविण्यात आला आहे.

· सर्व कॅमेरा ट्रॅप साइटमधून प्रथमच सर्व वाघांचे लिंग प्रमाण केले गेले.

· मानववंशविषयक तपशीलांचा वापर वाघांची लोकसंख्या मोजण्यासाठी करण्यात आला.

· व्याघ्र प्रकल्पातील रचनेत वाघांचे असणारे प्रमाण काढण्यात आले.

भारतात वाघांची संख्या आता २९६७ आहे. जी जगातील वाघाच्या लोकसंख्येच्या तुलनेत ७० टक्के आहे. झालेल्या सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक कॅमेराचे जाळे पसरवून सर्वेक्षण करण्यामध्ये भारताने जागतिक विक्रम नोंदविला केला आहे.

राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमधील वाढती वाघांची संख्या

आज प्रकाशित झालेल्या अहवालामध्ये महाराष्ट्रात असणाऱ्या ६ व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण ३१२ वाघांची संख्या नोंदविण्यात आली आहे. यापुर्वीच्या प्रसिद्ध अहवालामध्ये २००६ मध्ये ही संख्या १०३, २०१० मध्ये १६८, २०१४ मध्ये १९० आणि आता २०१८-१९ च्या सर्वेक्षणामध्ये हा आकडा वाढून ३१२ झाला असल्याचे नोंदविण्यात आले आहे. यामुळे भविष्यात व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन क्षेत्रात वाढ होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *