वैजापूर शहरात माझी वसुंधरा अभियानांतर्गत 10 हजार वृक्षांची लागवड ; जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण

वैजापूर ,२८ जून  /प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या “माझी वसुंधरा” अभियानांतर्गत वैजापूर नगरपालिकेतर्फे शहरात 50 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून यावर्षी 10 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या अनुषंगाने मंगळवारी (ता.28) शहरात 600 वृक्षांची लागवड करण्यात आली. बुधवारी (ता.29) सकाळी दहा वाजता  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते शहरातील सुख शांती नगर येथील खुल्या जागेत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. 

नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, उपनगराध्यक्ष साबेर खान व पालिकेचे मुख्याधिकारी बी.यु.बिघोत यांच्याहस्ते व मार्गदर्शनाखाली आज शहरातील नारंगी-सारंगी नदीकाठच्या अमरधाम स्मशानभूमी लगत असलेल्या खुल्या भूखंडावर 600 वृक्षांची लागवड करण्यात आली.यामध्ये सिसम,पेरू, जांभूळ, चिंच, करंजी, आपटा, आवळा, कडूलिंब, वड व पिंपळ या वृक्ष जातींचा समावेश आहे.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत जून 2020 ते जून 2025 या पाच वर्षांमध्ये पालिका क्षेत्रात 50 हजार वृक्ष लागवडीचे  उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे त्या अनुषंगाने सन 2020-21 या वित्तीय वर्षात शहरातील विविध खुल्या भूखंडामध्ये प्रत्येकी 10 हजार असे एकूण 20 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सन 2022 -23 मध्ये 10 हजार वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी तीन हजार वृक्षांची लागवड पूर्ण झाली असून उर्वरित 7 हजार वृक्षांची लागवड 15 ऑगस्ट 2022 पूर्वी करण्यात येणार आहे.अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी बी.यु.बिघोत यांनी दिली.

शहरात आज पालिकेतर्फे जवळपास सहाशे झाडांची लागवड करण्यात आली आहे. नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, उपनगराध्यक्ष साबेर खान, मुख्याधिकारी बी.यु.बिघोत, नगरसेवक गणेश खैरे, बजरंग मगर आदी उपस्थित होते. पालिकेतील स्वछता विभागातील सुरेश चिमटे, विष्णू आलूले, प्रमोद निकाळे व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.