ठोठावलेल्या शिक्षे विरोधात अपील:आरोपीला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि २० हजार रुपये दंड

ठोठाविण्‍यात आलेला दंड नुकसान भरपाई म्हणुन फिर्यादीला देण्‍याचे आदेश

औरंगाबाद ,२८ जून /प्रतिनिधी :- घरात घुसून महिलेला मारहाण करुन महिलेसह तिच्‍या मुलाला फावड्याने जीवे मारण्‍याची धमकी दिल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी यांनी ठोठावलेल्या शिक्षे विरोधात आरोपी बाबासाहेब बाजीराव सोनवणे (४३, रा. ता. कन्नड) याने अपील दाखल केले होते. अपीलाच्‍या सुनावणीअंती आरोपी सोनवणे याला कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा प्रधान जिल्हा व सत्र न्‍यायाधीश वाय.जी. खोब्रागडे यांनी ठोठावली. विशेष म्हणजे ठोठाविण्‍यात आलेला दंड नुकसान भरपाई म्हणुन फिर्यादीला देण्‍याचे आदेश देखील न्‍यायालयाने दिले आहेत.

याप्रकरणी १८ जानेवारी २०१८ मध्‍ये कन्नडच्‍या प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी यांनी आरोपी बाबासाहेब सोनवणे याला एक वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. शिक्षे विरोधात आरोपी बाबासाहेब सोनवणे अपील दाखल केले होते. याचदरम्यान आरोपी व फिर्यादीमध्‍ये तडजोड झाली. मात्र दाखल गुन्‍ह्यातील भादंवी कलम ४५२ हे तडजोडीस पात्र नसल्यास न्‍यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली.

प्रकरणात ४० वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार पीडितेच्‍या पतीचे निधन झाल्याने ती माहेरी आई-वडीलांकडे राहते. १० नोव्‍हेंबर २००८ रोजी सायंकाळी पीडिता ही घरी एकटी असतांना आरोपी हा दारु पिवून पीडितेच्‍या घरात घुसला आणि तिला विनाकारण शिवीगाळ करु लागला. त्‍यावर पीडितेने ही बाब वडीलांना सांगते असे म्हणाली असता आरोपीने तेथून धूम ठोकली. १३ नोव्‍हेंबर २००८ रोजी पीडिता ही गावातील ग्रामपंचायती समोरुन येत असतांना आरोपीने तिला अडवले. व तू जाऊ नको, माझ्या घरी चल असे म्हणाला. घाबरलेल्या पीडितेने सरळ आपले घर गाठले. मात्र आरोपी पिछा पुरवित पीडितेच्‍या घरी आला. त्‍यावेळेस घरात पीडितेसह तिची आई व आजारी भाऊ होता. आरोपीने घरात येवून पुन्‍हा पीडितेला शिवीगाळ सुरु केली, पीडितेच्‍या तोंडावर चप्पल फेकून मारली. तसेच हातातील फावडे दाखवून पीडितेसह तिच्‍या मुलाला जीवे मारण्‍याची धमकी देत दमदाटी करु लागला. घाबरलेल्या पीडिता व तिच्‍या आईने आरडा-ओरड केली. आवाज एकूण गल्लीतील लोक पीडितेच्‍या घरी आले व आरोपीला घरातून बाहेर काढले. प्रकरणात पिशोर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

खटल्याच्‍या सुनावणीअंती कन्‍नड प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी यांनी आरोपी बाबासाहेब सोनवणे याला दोषी ठरवून भादंवी कलम ४५२ अन्‍वये एक वर्षे सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड, कलम ३२३,५०४ आणि ५०६ अन्‍वये सहा महिने सक्तमजुरी, प्रतेकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच नुकसान भरपाई म्हणुन तीन हजार रुपये पीडितेला देण्‍याचे आदेशात नमुद केले. या‍ शिक्षे विरोधात आरोपीने जिल्‍हा व सत्र न्‍यायालयात अपील दाखल केले होते.

प्रकरणात अतिरिक्त सरकारी लोकाभियोक्ता सुनिलकुमार बर्वे यांनी काम पाहिले. तर पैरवी अधिकारी म्हणुन जमादार राधा रिठे यांनी काम पाहिले.