शिंदेंचा मुख्यमंत्र्यांना आणखी एक धक्का; आठवा मंत्रीही गुवाहाटीत

मुंबई : मंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. आमदारांच्या बंडखोरीमुळे हैराण झालेल्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.

महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे देखील आता गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीला पोहचल्याची माहिती समोर आली आहे. बंडखोरांच्या गटात सामील झालेले उदय सामंत हे शिवसेनेचे आठवे मंत्री आहेत.

आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारमधील एकनाथ शिंदे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, बच्चू कडू, शंभूराज देसाई यांच्यानंतर उदय सामंत हे आठवे मंत्री आहेत. सामंत यांच्या गुवाहाटीला जाण्याने आता शिवसेनेत विधानसभेतून निवडून आलेले केवळ एकमेव आदित्य ठाकरे हे मंत्री शिल्लक राहिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे.