शिवसेनेच्या १६ बंडखोरांना अपात्रतेच्या नोटीसचा वाद आता न्यायालयात

शिंदे गटाचे नाव ठरले! ‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’

गुवाहाटी : महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचा पुढील अंक आता अपेक्षेनुसार कोर्टात रंगणार असल्याची दाट शक्यता आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे यांच्या गटातील १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली आहे. या नोटिशीविरोधात एकनाथ शिंदे आता सुप्रीम कोर्टात धाव घेण्याच्या तयारीत आहेत.

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या चर्चेनंतर शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांची भेट घेत बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी १२ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी आणखी ४ आमदारांना अशा एकूण १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांनी बंडखोर गटातील १६ आमदारांना अपात्रेची नोटीस बजावली.

त्यानंतर आता शिंदे गटाने या नोटीशीला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात दोन अपक्ष आमदारांचा याधीच अविश्वास प्रस्ताव आहे. त्यामुळे त्यांना अपात्रतेची नोटीस बजावण्याचा अधिकार नसल्याचा मुद्दा शिंदे गटाने उपस्थित केला आहे. कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर शिंदे गट आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. शिंदे गट आता पक्ष प्रमुख ठाकरे यांना मात देण्यासाठी कायदेशीर मार्गाचा वापर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाचे नाव ठेवले असून ‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’ असे शिंदे गटाचे नाव असेल. आज संध्याकाळी या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. एबीपी माझाने ही माहिती दिली आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी दिली आहे. बाळासाहेबांचे नाव वापरुन सहानुभूती दाखवायची गरज नाही. त्यांना हे नाव वापरण्याचा अधिकार नाही. आम्हाला पक्षप्रमुखांनी आदेश दिले नाहीत म्हणून आम्ही शांत आहोत, अशा भावना शिवसेना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

शिवसेना आणि ठाकरे नाव न वापरता जगून दाखवा, असे आव्हान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल बंडखोरांना दिलं. त्यानंतर आज शिंदे गटाचं नाव समोर येत आहे. शिवसेना-बाळासाहेब ठाकरे असं नाव शिंदे गटानं निश्चित केलं आहे. याबद्दलची घोषणा आज संध्याकाळी होण्याची शक्यता आहे. एबीपी माझानं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. दरम्यान, शिंदे यांच्या गटाच्या नावात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांचंही नाव आल्याने सेनेच्या गोटात नाराजी वाढली आहे.

शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदूत्वाचा मुद्दा पुढे करत खरी शिवसेना त्यांचीच असल्याचा दावा केला आहे. यामुळे खरी शिवसेना कोणाची, हा पेच आता वाढला आहे. दोन्ही गटांनी कायदेशीर लढाईला सुरुवात केली आहे.

आपल्यासोबत एकूण ४६ आमदार आहे. शिवसेनेचे दोन-तृतीयांश आमदार आपल्यासोबत आहेत. त्यामुळे खरी शिवसेना माझ्यासोबत असल्याचा दावा शिंदे यांनी केला होता. त्यामुळे शिंदे त्यांच्या गटाला काय नाव देतात, याची उत्सुकता होती. शिंदेंनी आपल्या गटासाठी शिवसेना-बाळासाहेब ठाकरे हे नाव निश्चित केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता शिंदे आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.

आम्ही शिवसैनिकच आहोत आणि शिवसैनिकच राहू. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. बाळासाहेब ठाकरेंनी दिलेल्या हिंदुत्त्वाच्या मार्गावर आम्ही वाटचाल करत आहोत, असं शिंदे बंड केल्यापासून सांगत आहेत. बंडाच्या पहिल्या दिवसापासून त्यांची हीच भूमिका राहिलेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेना हिंदुत्त्वापासून दूर गेल्याची शिंदेंसोबतच्या आमदारांची भावना आहे.

माझ्यासोबत ३७ हून अधिक सेना आमदार आहेत. त्यामुळे खरी शिवसेना माझ्यासोबत आहे, असं म्हणत शिंदेंनी थेट शिवसेनेवरच दावा केला आहे. पक्षाचं चिन्ह मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हिंदुत्त्वासोबत तडजोड नाही म्हणत त्यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं आहे. त्यामुळेच आधी आवाहनाची भाषा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा सूरदेखील बदलला आहे. शिवसेना आणि ठाकरे ही नावं न वापरता जगून दाखवा, असं थेट चॅलेंज कालच उद्धव यांनी दिलं होतं.