ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात औरंगाबाद जिल्ह्यात होणार “सेरो सर्वेक्षण” – जिल्हाधिकारी उदय चौधरी
औरंगाबाद दि. 28 – जिल्ह्यात कोरोनामुळे झालेला प्रादुर्भाव लक्षात यावा व त्यादृष्टीने उपाययोजना करण्यास प्रशासनाला मदत व्हावी यासाठी केंद्रीय पथकाच्या शिफारसीनुसार जिल्ह्यात ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात “सेरो सर्वेक्षण” करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी व मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी आज केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोविड-19 आजाराच्या अनुषंगाने ॲटीबॉडीज तपासणीच्या दृष्टीने सेरो सर्वेक्षणाबाबत बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, जनऔषध व वैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. जगन्नाथ दिक्षित, सुक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती बजाज, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब सय्यद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, एमजीएमच्या डॉ. शोभा साळवे आदींची उपस्थिती होती.
कोरोना विषाणूनंतर शरिरात विकसित होत असलेल्या IgG, IgM अँटीबॉडीज तपासण्यासाठी सर्वेक्षण करुन निवडक चाचण्या करण्यात येणार आहेत. या चाचण्यांची तपासणी घाटीतील प्रयोगशाळेत करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया दिल्लीच्या धर्तीवर राबविण्यात येणार आहे. या तपासणीसाठी जिल्ह्या ची वाळूज-बजाज महानगर, महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण असे 3 विभागात विभागणी करण्यात आली आहे. या तपासणीसाठी रँडम सॅम्पलिंग पद्धतीने घटकांची निवड करण्यात येऊन वैज्ञानिक पद्धतीने तपासणीसह अभ्यास करण्यात येणार आहे. यासाठी घाटीच्या इन्स्ट्यिूशनल इथिक्स कमिटीच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी लागणारे सॅम्पल जिल्हा परिषद, महानगरपालिका एकत्रित करुन प्रयोगशाळेस तपासणीसाठी पाठवणार आहे.
या अभ्यासातून शहरात तसेच जिल्ह्यात कोरोनामुळे झालेला प्रादुर्भाव लक्षात येण्यास मदत होईल. तसेच प्रशासनाला सर्वेक्षणांती केलेल्या तपासणीतून पुढील दिशा ठरवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत केलेल्या उपाययोजना व करावयाच्या बदल याबाबत स्पष्टता येण्यास मदत होणार आहे. यापूर्वीच अशा पद्धतीचे सर्वेक्षण मराठवाड्यातील परभणी, बीड आणि नांदेड या जिल्ह्यात झालेले आहे, असेही श्री. चौधरी म्हणाले. तर मनपा आयुक्त श्री. पांडेय यांनी शहरातील 115 वॉर्डमध्ये पथके तैनात करुन वेळेत सॅम्पल गोळा करुन शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील.या तपासणीच्या माध्यमातून शहरातील सर्व घटकांची रँडमाईज पद्धतीने तपासणी करण्यात येणार आहे, असे यावेळी सांगितले.
डॉ. दिक्षीत, डॉ. मुजिब, डॉ. बजाज, डॉ. गंडाळ, डॉ. साळवे यांनीही सर्वेक्षणात आवश्यक असणाऱ्या बाबींबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. मुजीब यांनी जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला किंवा कसे याबाबत या पद्धतीतून समजण्यास प्रशासनास मदत होणार आहे. यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सादरीकरणाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली.