गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांना मतदार संघात फिरू देणार नाही- जयवंत कदम

नांदेड ,२५ जून  /प्रतिनिधी :- एका सिमेंटच्या दुकानावर रात्रंदिवस सिमेंटच्या धूळीत वावरणाऱ्या आमदार बालाजी कल्याणकर यांना शिवसेनेने आजपर्यंत नगरसेवक, महापालिका विरोधी पक्षनेते आणि आता थेट विधिमंडळात पाठवले. मात्र त्यांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. गद्दारी करून बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गोटात गेले. गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांना मतदारसंघात फिरू देणार नाही, असा जळजळीत इशारा शिवसेनेचे नांदेड उत्तरचे तालुकाप्रमुख जयवंत कदम यांनी दिला आहे.

सर्वसामान्यांना न्याय देणारा पक्ष म्हणून आजही तमाम मराठी माणूस शिवसेनेकडे पाहतो. या पक्षामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळतो असाच अन्याय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदेड उत्तरचे गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांना दिला होता. भाजपप्रणित बालाजी कल्याणकर हे सुरुवातीपासूनच निष्ठावंत शिवसैनिकांसोबत राहिले नाहीत. अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विकास निधी शिवसैनिकांना दिला नाही. शिवसेनाव्देशी यांना दिला आहे. शिवसेनेने त्यांना भरभरून दिले असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून मतदार संघातील नव्हे जिल्ह्यातील तमाम कट्टर शिवसैनिकांना अंधारात ठेवत आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

शिवसेनेचे खासदार हेमंतभाऊ पाटील, संपर्कप्रमुख आनंद जाधव, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, आनंद बोंढारकर, भुजंग पाटील, धोंडू पाटील, मनोज भंडारी, प्रकाश मारावार, दयाल गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंत कदमने हा बालाजी कल्याणकर यांना इशारा दिला आहे. शिवसेनेच्या विरोधात नेहमी ओळख असणारे नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ही आज बालाजी कल्याणकर यांची पाठ थोपटून त्यांच्या केसाला धक्का लागू न देण्याची ग्वाही दिली. शिवसेनेने खासदार चिखलीकर यांनाही निवडून दिले होते, याचाही त्यांना विसर पडला आहे. खासदार साहेबांनाही या पत्राद्वारे चेतावनी देण्यात येत आहे की बालाजी कल्याणकर नांदेडमध्येच काय पण मतदारसंघात पाय ठेवून दाखवावा, त्यांना जर आपली साथ असेल तर आपल्याशीही दोन हात करण्याची तयारी जिल्ह्यातील शिवसैनिकांची आहे. एकनाथ शिंदेसारख्या गद्दार नेत्याच्या पाठीमागे राहून बालाजी कल्याणकर याने मतदार संघातील तमाम शिवसैनिकांचा, मतदारांचा अपमान केला आहे. तो अपमान कदापि सहन केल्या जाणार नाही. येणाऱ्या काळात शिवसेना, शिवसैनिक कामाला लागून आमदार बालाजी कल्याणकर यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत.