‘सरसेना’ उरते की शिवसेना; तालुक्यात उत्सुकता पोहोचली शिगेला

वैजापूर ,२४ जून  /प्रतिनिधी :- सेनेचे आमदार रमेश बोरनारे नगरविकासम॔त्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात जाऊन सामील झाल्याने तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून पक्षातर्गंत असलेले बोरनारेंचे विरोधक चांगलेच अॅक्टिव्ह झाले आहेत. विशेषतः बोरनारेंकडून दुखावलेले दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध रणशिंग फुंकून सेनेच्या पक्षनेतृत्वाच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वैजापुरात ‘सरसेना’ उरते की शिवसेना हे आगामी काळात कळलेच.    

राज्याचे नगरविकासम॔त्री एकनाथ शिंदे यांनी सेनेचे आमदार गायब करून मोठा  राजकीय भूकंप केला आहे. या गोटामध्ये सेनेचे सेनेचे आमदार रमेश बोरनारे यांचाही समावेश आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता त्याचे पडसाद स्थानिक पातळीवरही उमटू लागले आहेत. केवळ अपवाद काही बोरनारे समर्थक वगळता पक्षातील बहुतांश लोकप्रतिनिधींसह  पदाधिकारी व कार्यकर्ते आजही सेनेसोबतच असल्याचा दावा करीत असून बोरनारेंनी पक्षाशी दगाबाजी केल्याची भावना या सर्वांकडून व्यक्त केली जात आहे. नाही म्हणायला सेनेत अगोदरपासूनच गटबाजी पहावयास मिळत होती. बोरनारे आमदार झाल्यानंतर सेनेचे माजी आमदार स्व. आर. एम. वाणी यांच्या जुन्या समर्थक कार्यकर्त्यांचा अचानक पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांना सातत्याने डावलण्यात येत  असल्याने ते सेनेच्या कोणत्याही कार्यक्रमात दिसत नाही. जुन्या कार्यकर्त्यांची गेल्या अनेक दिवसांपासून ही खदखद आहे.  परंतु आपली घुसमट सांगावी कुणाला? हाच खरा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

बुधवारी औरंगाबाद येथे सेनेच्या बंडखोर आमदारांविरुध्द आंदोलन करण्यात आले. यात सेनेचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय निकम,  उपनगराध्यक्ष साबेरखान, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी मिसाळ, रामहरी जाधव,  बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब गलांडे, नगरपालिकेचे  गटनेते प्रकाश चव्हाण,  तालुकाप्रमुख सचिन वाणी आदींसह अन्य सेनेचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. यावरूनच बोरनारेंसोबत किती प्रमुख पदाधिकारी आहे. याचा अंदाज येतो. बोरनारेंनी पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून बंडखोरीचा निर्णय घ्यायला हवा होता. असाही सूर व्यक्त होत आहे.बोरनारेंच्या या कृतीमुळे पक्षातील नाराज विरोधक गट अचानक अॅक्टिव्ह होऊन बोरनारेंविरुध्द नारेबाजी सुरू केली आहे. त्यामुळे वैजापुरात ‘सरसेना’ राहते की शिवसेना हे मात्र येत्या काही दिवसांत समजणार आहे. 

अविनाश गलांडे

आ. बोरनारेंनी केलेले बंड चुकीचे आहे. त्यांनी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घ्यायला हवा होता. ते कुठेही गेले तरी माझ्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सेनेसोबतच राहतील. 
– अविनाश गलांडे, माजी शिक्षण व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद, औरंगाबाद

मनाजी मिसाळ

आम्ही सेनेचे माजी आमदार आर.एम.वाणी यांचे सैनिक आहोत. पक्षाशी कदापि गद्दारी करणार नाही. ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली. ते संपून गेले. त्यामुळे आम्ही सेनेसोबतच राहणार.
  – मनाजी मिसाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य, वैजापूर