वैजापुरातील शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आ. बोरणारे विरोधात एकवटले

घर जळत असताना आम्ही स्वस्थ कसं बसायचं ? – ऍड.रोठे

औरंगाबाद ,२४ जून /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील शिवसेनेचे आमदार रमेश बोरणारे हे नगरविकासम॔त्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटात जाऊन सामील झाल्याच्या  पार्श्वभूमीवर पक्षातील जुन्या व नूतन पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ज्यांची सरपंच व्हायची लायकी नव्हती, ते मात्र केवळ सेनेच्या वरिष्ठ व स्थानिक पक्षनेतृत्वाच्या जिवावर आमदार झाले. अशा जहाल शब्दांत बोलून पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत आहे. घर जळत असतांना आम्ही स्वस्थ कसं बसायचं ? असा संतप्तजनक सवाल पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

सेनेचे जेष्ठ नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अॅड. आसाराम रोठे

राज्याचे नगरविकासम॔त्री एकनाथ शिंदे यांनी पक्षनेतृत्वाविरुध्द बंड पुकारले. या बंडात सेनेचे आमदार रमेश बोरनारे हेही सहभागी झाले आहेत. या बंडामुळे राज्यासह स्थानिक पातळीवरील राजकारण ढवळून निघाले आहे. विशेषतः बोरनारेंच्या या कृतीचा स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला असून सर्वच सैरभैर झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बोरनारेंच्या नावाने शिमगा सुरू केला आहे. यानिमित्ताने पदाधिकारी खुलेआमपणे बोलून आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत आहे. तालुक्यातील सेनेचे जेष्ठ नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अॅड. आसाराम रोठे यांनी बोरनारेंच्या प्रतापावर संतापजनक व तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्यांची ग्रामपंचायतीचा सरपंच अथवा सदस्य होण्याची लायकी नव्हती, ते केवळ पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व सेनेचे माजी आमदार स्व. आर. एम. वाणी यांच्या कृपेमुळे विधानसभा सदस्य झाले. मी स्वतः वाणी यांच्यासोबत राजकारणात 40 वर्षे काढली. परंतु वरिष्ठ व स्थानिक पक्षनेतृत्वासोबत कधीच गद्दारी केली नाही. बोरनारेंनी केवळ पक्षनेतृत्वाशीच गद्दारी केली नाही तर स्व. आर. एम. वाणी यांच्या विचारांशीही प्रतारणा केली. बोरनारेंनी पक्षाशीच नाही तर जनतेशीही दगाबाजी केली. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. पक्षात आम्ही 40 वर्षे घालविलेली असून वाणी यांच्यासोबतच मीही पक्षवाढीसाठी योगदान दिलेले आहेत. तालुक्यात सेना आम्ही रुजवली. वाणी हे सेनेचा चेहरा होते. सेना म्हणजे आमचे घर आहे. त्यामुळे घर जळत असताना आम्ही स्वस्थ कसे बसणार?  असा प्रश्न उपस्थित करून गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलण्यात येत आहे. या बाबीची खंत नाही. परंतु बोरनारेंनी पक्षाशी केलेली गद्दारी सहन होण्यासारखी नाही. आज स्व, वाणी हयात असते तर बोरनारेंनी ही हिंमत केली नसती. अशा शब्दांत  अॅड. रोठे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.  बोरनारेंच्या अनुयायांचा अपवाद वगळता सर्वच शिवसैनिक त्यांच्याविरुद्ध एकवटले आहे.