म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे ९८४ सदनिका,२२० भूखंडांच्या वितरणासाठी सोडत जाहीर

 पहिल्यांदाच प्रतीक्षा यादी विना सोडत जाहीर

औरंगाबाद ,२४ जून /प्रतिनिधी :- खासगी घरे विकली जात नाहीत अशी परिस्थिती असताना म्हाडाच्या औरंगाबाद मंडळाच्या एक हजार २०४ सदनिका आणि भूखंडांकरिता ११ हजार अर्जदारांचा मिळालेला प्रतिसाद म्हणजे नागरिकांची म्हाडाच्या कार्यप्रणालीवरील विश्वासार्हता सिद्ध करते याचा मला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आज केले.

May be an image of 3 people, people sitting, people standing and indoor

म्हाडाच्या औरंगाबाद गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांतील विविध गृहप्रकल्पांतर्गत ९८४ निवासी सदनिका व २२० भूखंडांच्या वितरणाकरिता संगणकीय सोडत काढण्याचा कार्यक्रम गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या ठाणे येथील नाद या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.  या कार्यक्रमाला औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती संजय केणेकर, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, औरंगाबाद मंडळाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे, म्हाडाचे वित्त नियंत्रक दिग्विजय चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा जायभाये-धुळे, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी श्रीमती सविता बोडके आदी उपस्थित होते. तर औरंगाबाद येथे मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधनीतील या सोडतीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे,  नोडल अधिकारी तथा  कार्यकारी अभियंता वैभव केदारे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जयकुमार नामेवार, इस्टेट व्यवस्थापक श्रीमती एस.एच. बहुरे आदींसह म्हाडाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थ‍िती होती. 

May be an image of 4 people and text that says "म्हाडा AURAN 127 27/218 Scheme Back म्हाडा MHADA"

सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची ऑनलाईन संगणकीय सोडतीला दुपारी १ वाजता गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते संगणकावर क्लिक करून सुरवात करण्यात आली. सोडत प्रक्रियेत सहभागी अर्जदारांकरिता मराठवाडा महसूल प्रबोधिनी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सोडतीचे वेबकास्ट प्रणालीद्वारे थेट प्रक्षेपणाची देखील सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. सोडत कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सभापती संजय केणेकर यांनी केले.

याप्रसंगी बोलताना श्री. आव्हाड म्हणाले, कोरोना आणि तत्सम ताळेबंदीच्या कालावधीनंतर गेल्या दोन वर्षांत म्हाडाच्या माध्यमातून राज्यातील विभागीय मंडळांतर्गत अद्यापपर्यंत ३१,९३५ सदनिकांच्या  सोडती काढण्यात आल्या आहेत. म्हाडाच्या संगणकीय सोडत प्रणालीवर नागरिकांचा प्रचंड विश्वास आहे. ही सोडत प्रणाली अधिकाधिक पारदर्शक करून लोकांना मदत करणारे कायदे करण्यावर प्रशासनाची कायम भूमिका राहिली आहे. म्हणूनच यंदाच्या सोडतीपासून यशस्वी अर्जदारांसह जाहीर करण्यात येणारी प्रतीक्षा यादी न काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.  अशाप्रकारे सोडतीतील पात्र न ठरलेल्या अर्जदारांच्या सदनिका पुढे येणाऱ्या सदनिका विक्री सोडतीच्या जाहिरातीत समाविष्ट करण्यात येतील, अशी माहिती श्री. आव्हाड यांनी याप्रसंगी दिली. वर्षानुवर्ष प्रतीक्षा यादीवरील घर रिकामी पडून राहतात, त्यामुळे म्हाडाचे आर्थिक नुकसान होत असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

आजच्या संगणकीय सोडतीत प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातील ३३८, यामध्ये लातूर एमआयडीसी येथे ३१४ सदनिका, सिरसवाडी रोड, जालना येथे १८ सदनिका, औरंगाबाद येथील नक्षत्रवाडी येथे ६ सदनिकांचा समावेश आहे.  म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी भोकरदन (जि. जालना) येथे २७ भूखंड व २ सदनिका, अंबड (जि. जालना) येथे ६ सदनिका, सिरसवाडी रोड, जालना  येथे ३८ सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी सोडतीत भोकरदन (जि. जालना) येथे ९ भूखंड, हिंगोली येथे १६ सदनिका, टोकवाडी (ता. मंठा, जि. जालना) येथे ५३ भूखंड, औरंगाबाद येथील गृहनिर्माण भवनाजवळ ४ सदनिका, देवळाई (जि. औरंगाबाद) येथे २ सदनिका, नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथे १९ भूखंड  यांचा समावेश होता. २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटासाठी काळे इस्टेट, इटखेडा, ता. जि. औरंगाबाद येथे ३१ सदनिका तर देवळाई (जि. औरंगाबाद) येथे २३ सदनिका आणि  म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत उच्च उत्पन्न गटासाठी  भोकरदन (जि. जालना) येथे ७ भूखंड, टोकवाडी (ता. मंठा, जि. जालना) येथे १ भूखंड, बन्सीलाल नगर येथे १ सदनिका उपलब्ध होती. तसेच सर्व उत्पन्न गट या गटांतर्गत उत्पन्न मर्यादा शिथिल करण्यात आली असून या गटासाठी  पैठण (जि. औरंगाबाद) येथे २१ सदनिका, देवळाई (जि. औरंगाबाद) येथे ३९ सदनिका या सोडतीत समाविष्ट होत्या. अल्प उत्पन्न गटासाठी (Lower Income Group) भोकरदन (जि. जालना) येथे ९ भूखंड, कन्नड (जि. औरंगाबाद) येथे ६ सदनिका, हिंगोली येथे ३५ सदनिका, परभणीतील गंगाखेड रोड येथे २५ सदनिका व ३४ भूखंड, उस्मानाबाद एमआयडीसी एरिया येथे ५ सदनिका, चिखलठाणा (औरंगाबाद) येथे ३९० सदनिका, सेलू (जि. परभणी) येथे २ भूखंड, देवळाई (जि. औरंगाबाद) येथे १ गाळा, नवीन कौठा (जि. नांदेड) येथे १ सदनिका, नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथे ५९ भूखंडांकरिता विक्रीसाठी उपलब्ध होते. 

म्हाडाच्या या ऑनलाईन जाहिरातीस अनुसरून एकूण ११ हजार ३१४ अर्ज प्राप्त झाले होते. सोडत प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणाऱ्या देखरेख समितीवरील सदस्यांच्या उपस्थितीत  संगणकीय सोडतीचे यशस्वी नियोजन करण्यात आले.  या देखरेख समितीवर निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. जी. शेट्ये, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी ए.आर. थोरात होते. या सोडतीवर योग्य देखरेख ठेवण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. सोडत यशस्वीतेसाठी म्हाडातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.