द्रौपदी मुर्मू दिल्लीत दाखल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

नवी दिल्ली ,२३ जून  /प्रतिनिधी :-भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू गुरुवारी देशाची राजधानी दिल्ली येथे दाखल झाल्या असून त्या आज (शुक्रवारी) नामांकन पत्र दाखल करणार असल्याचे समजते. दरम्यान, दिल्ली येथे त्यांनी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक पुढील महिन्यात होणार असून त्यासाठी सत्ताधारी रालोआ आणि विरोधी पक्षांतर्फे आपापले उमेदवार जाहिर करण्यात आले आहेत. रालोआतर्फे झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी केली.
 

मुर्मू विजयी झाल्यानंतर त्या देशाच्या पहिल्या वनवासी महिला राष्ट्रपती ठरणार आहेत. द्रौपदी मुर्मू या आज, शुक्रवारी आपले नामांकन दाखल करण्यात असल्याचे समजते. त्यांच्या प्रस्तावकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचा समावेश असणार आहे.

दरम्यान, मुर्मू यांनी दिल्लीत दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी ट्विट केले. ते म्हणाले, द्रौपदी मुर्मू यांची आज भेट घेतली. त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या नामांकनाचे देशभरातील सर्व थरातून स्वागत होत आहे. तळागातील समस्या, त्या सोडविण्याची त्यांची इच्छाशक्ती आणि देशाच्या विकासाप्रती असलेली त्यांची दृष्टी अजोड असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

मुर्मू यांनी यावेळी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली. यावेळी शाह म्हणाले, द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाच्या नामांकनाने आदिवासी समाजामध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. त्यांच्या सार्वजनिक जीवन आणि प्रशासकीय जीवनातील अनुभवाचा फायदा संपूर्ण देशाला होईल, असेही शाह म्हणाले.