आ.बोरणारे यांच्या बंडाने वैजापूर तालुक्यात खळबळ: सेना कार्यकर्त्यांना मोठा धक्का निष्ठावंत शिवसैनिक पक्षासोबतच

  • बोरनारेंच्या कार्यालयासह घराला बंदोबस्त 

वैजापूर ,२२ जून  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्याचे शिवसेना आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी शिवसेना नेते तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात सहभागी होऊन शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने वैजापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. सेनेच्या कार्यकर्त्यांना जबरदस्त धक्का बसला असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांनी थेट मुंबई गाठून त्यांनी उध्दव ठाकरेंना समर्थन दर्शविले आहे तर बोरणारे समर्थक भूमिगत झाले असून ते सध्या “नाॅट रिचेबल” आहेत. दरम्यान या राजकीय भूकंपानंतर आ.बोरणारेंच्या  संपर्क कार्यालयासह घरासमोर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

राज्याचे नगरविकासम॔त्री एकनाथ शिंदे यांनी सेनेच्या काही आमदारांना आपल्या बाजूने करून गुजरात गाठल्यामुळे राजकीय भूकंप झाला आहे. या गोटामध्ये तालुक्याचे सेनेचे आमदार रमेश बोरनारे यांचाही समावेश असल्यामुळे स्थानिक सेनेच्या कार्यकर्त्यांच्या पायखालची वाळू सरकली आहे. अपवाद बोरनारे समर्थक वगळता कार्यकर्त्यांना जबरदस्त धक्का बसला असून बोरनारेंच्या या निर्णयाबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कृपेमुळे विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळून ते विजयी झाले खरे. परंतु पक्षनिष्ठा विसरून खाल्लेल्या मिठाला न जागता त्यांनी बेईमानी केल्याचा सूर सेना कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे. विशेषतः जुन्या कार्यकर्त्यांनी बोरनारेंच्या या कृत्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बोरणारेंना  कुठेही जाऊ द्या. आम्ही मात्र सेनेच्या नेतृत्वासोबतच राहू. अशी भावना कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. सेनेतील एका गटाने थेट मुंबई गाठून उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वालाच पसंती दर्शवली आहे. सेनेचे माजी तालुकाप्रमुख संजय निकम, रमेश सावंत अन्य कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. बोरनारे समर्थक भूमिगत झाले असून ते सध्या नाॅट रिचेबल आहेत. कट्टर कार्यकर्त्यांकडून कोणताही हल्ला अथवा इजा होऊ नये म्हणून पोलिसांनी बोरनारेंच्या संपर्क कार्यालयासह घरासमोर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. बोरनारे शिंदेच्या गोटात सामील झाले खरे. परंतु या गोटाने भाजपच्या तंबूत दाखल होण्याचा निर्णय घेतला तर आपल्या आतापर्यंतच्या  राजकारणावर पाणी फिरेल. असा धसकाही भाजपच्या स्थानिक नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बोरनारे भाजपच्या गोटात दाखल होऊ नयेत.यासाठी भाजप नेते पाण्यात देव घालून बसले आहेत. बोरनारेंच्या भाजप प्रवेशामुळे तालुक्यातील राजकारणाचे समीकरण बदलण्याचा धसका सर्वांनीच घेतला आहे. दरम्यान या राजकीय भूकंपानंतर आगामी काळात तालुक्यात काय राजकीय उलथापालथ होते. हे मात्र येत्या काळात समजणार आहे. 

…. म्हणून लागले शिंदेच्या गळाला 

एकनाथ शिंदे यांनी आ.बोरणारे यांना तालुक्यातील विकास कामांसाठी भरभरून निधी दिला व त्यांची कामे ही केली त्यामुळे आ.बोरणारे हे शिंदे सांगतील त्यादिशेने जात होते.

शिवसेना कार्यकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

आ.बोरणारे यांच्या भूमिकेमुळे तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून बोरणारे यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप होत आहे. बोरणारे यांनी शिवसेना पक्षाशी गद्दारी केली असून त्यांना शिवसैनिक कदापी माफ करणार नाही.अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संजय पाटील निकम यांनी या संदर्भात बोलताना दिली.

आम्ही पक्षासोबत – सचिन वाणी 

माझे वडील आमदार स्व.आर.एम.वाणी हे कट्टर सैनिक होते. त्यामुळे आमचा बोरनारेंसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. तालुक्यातील सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षासोबतच आहे. बोरनारेंसोबत कुणीही जाणार नाही. एवढे मात्र नक्की. 
   – सचिन वाणी , तालुकाप्रमुख, वैजापूर

आ.बोरणारेंची क्लिप व्हायरल ….
दरम्यान आ.बोरणारेंची सेनेच्या एका कार्यकर्त्याशी मोबाईलवरील संभाषणसंभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. कार्यकर्त्याने  तुमचा निर्णय काय आहे ? असे विचारल्यानंतर यापुढे एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. असे बोरणारे म्हणतात. सध्या ही क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. या संभाषण क्लिपमुळे तालुक्यातील सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.