‘सज्ज राहा…’ भाजपाकडून सर्व आमदारांना सूचना

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ४५ हून अधिक आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारले आहे. त्यातच आता भाजपाने आपल्या सर्व आमदारांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

एकनाथ शिंदेंच्या बंडाची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तात्काळ दिल्लीकडे रवाना झाले होते. तिथे त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडून सर्व आमदारांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पुढचे ४८ तास संपर्कात राहा. कोणत्याही दौऱ्यावर किंवा परदेशामध्ये जाऊ नका, अशा सक्त सूचना भाजपाने सर्व आमदारांना दिल्या आहेत. कोणत्याही क्षणी तुम्हाला मुंबईला पोहोचायला लागू शकते. त्यामुळे सर्वांनी संपर्कात राहावे, अशा सूचना भाजपा हायकमांडने दिल्या आहेत.