भावना गवळींनी मुख्यमंत्र्याना पत्र लिहित, शिंदेंना पाठींबा

यवतमाळ : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर शिवसेनेचे अनेक आमदार त्यांच्यासोबत गेले आहेत. या पार्श्वभूमीवर यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र लिहून, शिंदे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्यावर विचार करण्याची विनंती केली आहे. याशिवाय, शिवसेनेच्या बंडखोर मावळ्यांवर कार्यवाही करू नये, अशी आर्जवही त्यांनी केली आहे.

‘सद्यस्थितीत निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे आपण व्यथित झाला आहात. पक्षापुढे आलेल्या संकटामुळे आपणासमोर खूप मोठे आव्हान असल्याची कल्पना मला आहे. एक शिवसैनिक म्हणून माझ्या मनातही खंत आहे,’ असे गवळींनी पत्रात म्हटले आहे.

आपल्या पक्षातील आमदार हिंदुत्वाच्या मुद्यावर आपणास एक मोठा निर्णय घेण्याकरीता विनंती करीत आहेत. हे सर्व शिवसेनेचे शिलेदार प्रथमतः हाडामासाचे शिवसैनिकच आहेत. त्यांच्या भावना समजून आपण त्यांच्यावर कुठलीही कठोर कार्यवाही न करता कठीण असला तरी शिवसेनेकरीता निर्णय घ्यावा, अशी विनंती भावना गवळी यांनी केली आहे.