योग साधनेमुळे शरीर व मन स्वास्थ्य लाभते- डॉ. श्रीकांत देशमुख

औरंगाबाद ,२२ जून /प्रतिनिधी :- केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालय, नवी दिल्ली, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, आयुष संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या निर्देशानुसार कांचनवाडी येथील छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्थेमध्ये आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.               

आपल्या भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदुरुस्त ठेवू शकतो; शिवाय मन आणि आत्मा यावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल.योग करण्यासाठी कोणत्याही प्रकारची साधन सामुग्रीची आवश्यकता नसते. सहज, सोपा कुठेही, कधीही करता येण्याजोगा सार्वदैहीक व्यायाम म्हणजे योग होय.
योग साधनेमुळे शरीर व मनाचे स्वास्थ्य लाभते यामुळेच आज जगभरात योगाचे महत्त्व वाढत आहे. जगभरातील विविध देशांमध्ये योग दिन साजरा केला जातोय. आणि भारत हे याचे प्रमुख केंद्र मानले जात आहे.असे प्रतिपादन संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकांत देशमुख यांनी केले.  
        तसेच आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी योग सप्ताह व त्यामध्ये योगाशी निगडित निरनिराळ्या स्पर्धां आणि व्याखाने आयोजित करण्यात आले. जनसामान्यात योगाचे महत्व पटवून देण्यासाठी योगा रॅली काढण्यात आली. ग्लोबल ब्रॅण्डिंग करण्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने ऐतिहासिक दौलताबाद किल्ला आणि वेरूळ लेणी येथे विद्याथिर्नीनी योगाची प्रात्यक्षिके करून योगाचे महत्व रुजविले.                    या योग शिबिरासाठी दंत महाविद्यालयाचे संचालक डॉ. सुभाष भोयर, कृषी महाविद्यालयाचे संचालक डॉ. डी. के. शेळके, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, दंत महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. लता काळे आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे शैक्षणिक विभागप्रमुख डॉ. जयश्री देशमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वस्थवृत्त विभागप्रमुख डॉ. सोनल अंतापुरकर व डॉ. वनिता पुरी यांनी केले. तसेच योग प्रात्यक्षिकांचे मार्गदर्शन योगशिक्षिका रुपा जाधव आणि सोनल तांदळे यांनी केले. संपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन आयुर्वेद महाविद्यालयाच्या स्वस्थवृत्त विभागाने केले.