तातडीने पावले उचलल्याने कोरोना मृत्यूंचे प्रमाण कमी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • 11,000 हून अधिक कोविड सुविधा केंद्र आणि 11 लाखांहून अधिक अलगीकरण खाटा उपलब्ध : पंतप्रधान
  • देशात दररोज 5 लाखांहून अधिक चाचण्या , येत्या आठवड्यात ही क्षमता दहा लाखांपर्यंत वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न सुरू: पंतप्रधान
  • आरोग्याच्या पायाभूत सुविधांना चालना देणे गरजेचे : पंतप्रधान

नवी दिल्ली,मुंबई 27 जुलै 2020:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, दीर्घ क्षमतेची तीन कोविड-19 चाचणी सुविधा केंद्रे सुरु केली. कोलकाता, मुंबई आणि नोएडा येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय संस्थांमध्ये ही सुविधा केंद्र आहेत.

उच्च-तंत्रज्ञान युक्त अत्याधुनिक चाचणी सुविधांमुळे या तीनही शहरांमधील प्रत्येकी दैनंदिन चाचणी क्षमता जवळपास 10,000 ने वृद्धिंगत होईल असे पंतप्रधान म्हणाले. अधिक प्रमाणात चाचणी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे कोरोना रुग्ण शोधण्यात आणि त्याच्यावर उपचार करण्यात मदत होईल ज्यामुळे या विषाणूच्या प्रसाराळा आळा घालण्यास मदत होईल. या प्रयोगशाळा केवळ कोविड चाचणीपुरत्या मर्यादित राहणार नाहीत तर भविष्यात हिपॅटायटीस बी आणि सी, एचआयव्ही, डेंग्यू आणि इतर अनेक आजारांचीही तपासणी करु शकतील, असेही त्यांनी नमूद केले.

वेळेवर निर्णय

पंतप्रधानांनी अधोरेखित केले की सरकारने वेळोवेळी घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे इतर देशांच्या तुलनेत कोविडमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण भारतात कमी आहे. इतर देशांच्या तुलनेत कोविडचे रुग्ण बरे होण्याचा दर देखील अधिक असून दररोज यामध्ये सुधारणा होत आहे. कोरोना विषाणूपासून बरे झालेल्या एकूण लोकांची संख्या 10 लाखांपर्यंत पोहोचली आहे.

कोरोनासाठी विशिष्ट आरोग्य पायाभूत सुविधा

कोरोनासाठी वेगाने विशिष्ट आरोग्य पायाभूत सुविधा विकसित करणे देशासाठी अत्यावश्यक आहे असे पंतप्रधान म्हणाले. या लढाईच्या सुरूवातीलाच केंद्राने 15,000 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली असल्याचे त्यांनी नमूद केले. देशात आता 11,000 हून अधिक कोविड सुविधा केंद्र आणि 11 लाखाहून अधिक अलगीकरण खाटा आहेत.

जानेवारीमध्ये देशात जिथे फक्त एक कोविड चाचणी केंद्र होते, तिथे आता अशा प्रकारच्या प्रयोगशाळेची संख्या जवळपास 1300 आहे. देशात सध्या दररोज 5 लाखांहून अधिक चाचण्या घेण्यात येत असून येत्या आठवड्यात ही क्षमता दहा लाखांपर्यंत वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

पीपीई किटच्या उत्पादनात देश दुसऱ्या क्रमांकावर असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सहा महिन्यांपूर्वी देशात एकही पीपीई किट उत्पादक नसण्यापासून ते आतापर्यंत दररोज 5 लाखांहून अधिक पीपीई कीट तयार करणारे 1200 हून अधिक पीपीई कीट उत्पादक असा प्रगतीचा प्रवास देशाने केला आहे. आयातीवर अवलंबून असणाऱ्या देशात आता दररोज 3 लाखाहून अधिक एन-95 मास्क तयार होत आहेत, वेंटिलेटरची वार्षिक उत्पादन क्षमता 3 लाख झाली असून वैद्यकीय ऑक्सिजनच्या सिलेंडरच्या उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यामुळे केवळ नागरिकांचे जीव वाचवायलाच मदत झाली नाही तर आयातदार देश ते निर्यात करणारा देश असे परिवर्तन देखील झाले आहे.

ग्रामीण भागात हा प्रसार रोखण्याच्या प्रयत्नांबद्दल बोलताना पंतप्रधानांनी नवीन आरोग्य पायाभूत सुविधा विकसित करण्याची तसेच खेड्यांमध्ये सध्या अस्तित्त्वात असलेल्या आरोग्य पायाभूत सुविधांना चालना देण्याची गरज नमूद केली.

मनुष्यबळाला चालना देणे

भौतिक पायाभूत सुविधांचा विकास करण्याबरोबरच, साथीच्या रोगांचा प्रसार नियंत्रित करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या पॅरामेडिक्स, आशा सेविका, अंगणवाडी कामगार इत्यदी मनुष्य बळाचा वेगाने विकास करण्यात देश यशस्वी झाला आहे असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या  कोरोना योद्ध्यांना थकवा येऊ नये म्हणून आरोग्य व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवीन व सेवानिवृत्त आरोग्य व्यावसायिकांना यामध्ये सतत सामावून घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

उत्सव काळात सुरक्षित राहणे

कोरोना विषाणूवरील नियंत्रण कायम ठेवण्यासाठी आगामी सण-उत्सवाच्या काळात लोकांनी जागरूक रहावे असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचे लाभ गरिबांपर्यंत वेळेवर पोहोचले पाहिजेत ही बाब त्यांनी अधोरेखित केली. ते म्हणाले की, जोवर लस तयार होत नाही तोवर लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी दो गज को दुरी, मास्क घालणे आणि वारंवार हात स्वच्छ धुणे ही सगळी सुरक्षिततेची साधने आहेत.

कोविड चाचणी साठी आता देशभरात प्रयोगशाळा उपलब्ध आहेत असे केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले. दिल्लीमध्ये विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसमवेत काम केल्याबद्दलही ते बोलले.

मुख्यमंत्री म्हणाले

चाचणी सुविधा सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिकूल परिस्थितीत पंतप्रधानांनी केलेल्या नेतृत्वाचे कौतुक केले. मुंबईतील ‘विषाणूचा पाठलाग’ (chase the virus) या उपक्रमाबद्दल माहिती दिली तसेच आणि कायमस्वरुपी संसर्ग रुग्णालये स्थापन करण्यावरही चर्चा केली.

मुंबईत रोगप्रतिकारकशक्तीविषयक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारण्यासाठी केंद्राने मदत करावी-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाच्या या भयंकर साथीतून आपल्याला खूप शिकायला मिळाले.महाराष्ट्राने अगदी प्रारंभापासून कोरोनाविरुद्ध प्रखर लढा दिला आहे. या साथींच्या रोगात प्रतिकार शक्तीचे महत्त्व लक्षात घेऊन मुंबईत रोगप्रतिकारशक्तीविषयक अद्ययावत प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारण्यास केंद्राने सहकार्य करावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  केली. 

कोरोना लढ्यात ही  आवश्यक सुविधा उपलब्ध केल्याबद्धल पंतप्रधानांना धन्यवाद देऊन मुख्यमंत्री म्हणाले, आज केवळ चाचणी, रुग्णांचे संपर्क शोधणे, आयसोलेशन अशा काही माध्यमांतूनच आपण लढतो आहोत. कोरोनावर उपचारासाठी निश्चित औषध आज तरी नाही, त्यामुळे सगळे विश्वच एक प्रयोगशाळा बनले आहे. महाराष्ट्र शासनाने मुंबई, पुणे तसेच इतर शहरांमध्ये कोरोना विषयक जम्बो सुविधा उभारण्यास सुरुवात केली असून मुंबईत तर २० दिवसांमध्ये आम्ही या सुविधा उभ्या केल्या आहेत. ‘चेस दि व्हायरस’ परिणामकारकरित्या राबविल्याने चांगले परिणाम दिसत आहेत.कोरोनावर निश्चित औषधोपचार नसल्यामुळे राज्याने देशात सर्वात मोठ्या प्रमाणावर प्लाझ्मा थेरपीचा उपयोग सुरु केला. या  थेरपीचा उपचारांमध्ये परिणामकारक उपयोग दिसू लागला आहे.

मुंबईच्या परिसरात कायमस्वरूपी असे संसर्गजन्य  रोगांवरील उपचार करणारे अद्ययावत रुग्णालय उभारण्याचा मानस व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, त्यामुळे येणाऱ्या अनेक जीवाणू आणि विषाणूजन्य रोगांचा ठामपणे मुकाबला करता येईल.

पीपीई किट्समास्क अधिक काळासाठी मिळाव्यात 

केंद्र सरकारने सप्टेंबरच्या पुढेदेखील राज्यांना पीपीई किट्स आणि एन ९५ मास्कचा पुरवठा करावा अशी विनंती करून मुख्यमंत्र्यांनी राज्यात जिल्ह्यांमध्ये डॉक्टर्सचे टास्क फोर्स आणि गावोगावी ग्राम दक्षता समित्या स्थापन करून कोरोना विषयक जनजागृती करीत आहोत असे सांगितले. मार्चमध्ये राज्यात २ प्रयोगशाळा होत्या. त्या आता १३० पर्यंत गेल्या आहेत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी इतर उपाययोजनांची देखील माहिती यावेळी दिली.  

चाचणी केंद्राविषयी माहिती

भारतीय वैद्यक संशोधन परिषद ( ICMR) ने देशातील तीन ठिकाणी ही अद्ययावत चाचणी सुविधा उभारली आहे. महाराष्ट्रात मुंबई येथे राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान ( NIRRH) तसेच कोलकाता आणि नोएडा अशी ही तीन ठिकाणे आहेत

या उच्च क्षमता केंद्रांमध्ये High Throughput COVID-19 सुविधा  असून या यंत्राचे वैशिष्ट्य हे आहे की, कोविड विषाणूच्या १२०० चाचण्या प्रत्येक दिवशी ३ पाळ्यांमध्ये आणि ते सुद्धा परिणामकारकरित्या केल्या जातात. यात स्वयंचलित नमुना तपासणीची प्रक्रिया  मोठ्या प्रमाणावर केली जाते, ग्रुप टेस्टिंग शक्य होते.

ही संपूर्ण प्रक्रिया यांत्रिक पद्धतीने होत असल्याने चाचणीचा वेग तर वाढतोच शिवाय प्रत्यक्ष हाताळणी न झाल्याने या केंद्रातील व्यक्ती सुरक्षित राहतात. एकदा नमुने या यंत्रात टाकले की कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय किंवा अडथळ्याशिवाय प्रक्रिया सुरु होते आणि अव्याहतपणे सुरु राहते. रिमोट एक्सेस पद्धतीने चाचणीचे अहवाल आणि विश्लेषण प्राप्त होते. यात प्रक्रियेवर रिअल टाईम देखरेख ठेवता येते

सध्या राज्यातील प्रयोगशाळामध्ये कोविड चाचणीसाठी बरीच मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. मॅन्युअल पद्धतीने RNA काढावा लागतो. त्यानंतर या नमुन्याची आरटीपीसीआर चाचणी दुसऱ्या यंत्रावर घेतली जाते. या नव्या प्रणालीत  इतर रोगांना कारणीभूत ठरणारे जीवाणू किंवा विषाणू यांच्याबाबतीत देखील नमुन्यांची चाचणी करता येते, जसे की, एचआयव्ही, एचसीव्ही, सीएमव्ही सद्य परिस्थितीत राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधानमध्ये आरटीपीसीआरवर आधारित प्रयोगशाळेत २०० चाचण्या दिवसाला होऊ शकतात.

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान संस्थानविषयी…

मुंबईतील या संस्थेने नुकतेच ५० वर्षे पूर्ण केली असून देशातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीला जन्माला घालण्याचा मान या संस्थेकडे जातो. प्रजननाच्या बाबतीत मूलभूत संशोधन याठिकाणी पार पाडले जाते.  

कोविडमुळे निर्माण झालेली आणीबाणीची परिस्थिती पाहता या संस्थेने पुढाकार घेऊन कोविडची अद्ययावत प्रयोगशाळा सुरु केली आहे.  

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान संस्थानने महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने डहाणू येथे मॉडेल रुरल हेल्थ युनिट स्थापन केले असून ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्याची काळजी घेण्यात येते. पालघर जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने या संस्थेने डहाणू येथे देखील एक चाचणी सुविधा सुरु केली आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा वाढविल्या

राज्यात २६६५ कोविड समर्पित आरोग्य केंद्रे आणि रुग्णालय.

एकूण ३ लाख ६ हजार १८० आयसोलेशन बेड्स. ऑक्सिजन बेड्स ४२ हजार ८१३

आयसीयू बेड्स ११ हजार ८८२

 ३७४४ व्हेंटीलेटर्स, ७ लाख ६ हजार ९११ पीपीई किट्स

१२ लाख ५९ हजार ३८२ एन ९५ मास्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *