फडणवीस दिल्लीत; अमित शाह, जेपी नड्डांच्या भेटीला

नवी दिल्ली : महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदेंमुळे राज्यातले वातावरण ढवळून निघत असताना फडणवीस तातडीने दिल्लीला पोहचले आहेत. तर अमित शाह हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटीला निघाले आहेत. या तिघांमध्ये आता भेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात येत्या काही तासात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व काही आमदार नॉट रिचेबल असल्याने राजकीय भूकंप होण्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील बंगल्याबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राज्यातील विधान परिषद निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. सोमवारी रात्रीपासून शिवसेना नेते आणि ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय असलेले एकनाथ शिंदे हे संपर्काबाहेर गेले होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे २५ आमदार सूरतमधील हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली होती. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा आहे.

विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे २५ आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली होती. मध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत १३ आमदार अनुपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेच्या गोटातील चिंता आणखी वाढली आहे. गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे आमदार यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.