ठाकरे सरकारला धक्का :महाविकास आघाडीची तब्बल वीस मते फुटली

भाजपची पाचही उमेदवार विजयी:कांग्रेसचे हंडोरे पराभूत 

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचा पुन्हा धुव्वा उडवला आहे. राज्यसभा निवडणुकीपेक्षा आणखी दहा मते जास्त मिळवून भाजपच्या पाचही उमेदवारांनी बेगमी केली. भाजपचे ११३ आमदारांचे संख्याबळ असताना ११३ मते मिळवून महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मते आपल्याकडे वळवली.राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर, भाजपचे राम शिंदे, उमा खापरे, प्रवीन दरेकर आणि श्रीकांत भारतीय यांचा विजय झाला आहे. शिवसेनेकडून आमशा पाडवी, सचिन अहिर यांचा विजय झाला आहे. 

विधान परिषदेच्या आज झालेल्या मतमोजणीत कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला. राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय यांना भाजपने पहिल्या पसंतीची ३० मते दिली. भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांना १७ मते पहिल्या पसंतीची मिळाली. याशिवाय प्रवीण दरेकर यांना २९, उमा खापरे यांना २७ अशी पहिल्या पसंतीची मते मिळाली. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे चारही उमेदवार प्रत्येकी २६ मते मिळवून विजयी झाले. तरी मते फुटल्याचे शल्य या पक्षांना झेलावे लागणार आहे.

शिवसेनेकडे अपक्षांसह पहिल्या पसंतीची सुमारे ६३ मते असताना आणि कॉंग्रेसकडे ४४ असताना कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची कोट्याइतकी मते मिळू शकली नाही. ही बाब या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक बाब ठरली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रामराजे यांना २९ आणि एकनाथ खडसे यांना २८ मते पहिल्या मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपले उमेदवार सहज निवडून आणले.

शिवेसनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना कोट्याइतकी म्हणजे प्रत्येकी २६ मते मिळाली. त्यामुळे ते देखील विजयी झाले. पण शिवसेनेच्या उमेदवारांना या पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवणे अपेक्षित होते. कॉंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना २२ व भाई जगताप यांना १९ पहिल्या पसंतीची मते मिळाली. याचा अर्थ कॉंग्रेसकडे ४४ मते असतानाही तीन मते फुटल्याचे दिसून येत आहे.

कोणाला किती मतं?

राम शिंदे- 30

श्रीकांत भारतीय- 30

एकनाथ खडसे- 29

प्रवीण दरेकर- 29

उमा खापरे- 27

अमशा पाडवी- 26

राम राजे निंबाळकर- 26

सचिन अहिर- 26

चंद्रकांत हंडोरे- 22

भाई जगताप- 20

प्रसाद लाड- 17

राज्यसभेनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद निवडणुकीतही चमत्कार घडवला आहे. भाजपचे पाचही उमेदवार फडणवीस यांनी निवडून आणले आहेत. 

देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
भाजपच्या दणदणीत विजयानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून आलेले आहेत. राज्यसभा निवडणुकीत आम्ही 123 मतं घेतली होती, आता विधानपरिषद निवडणुकीत आम्ही 134 मतं घेतली आहेत