पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा – वैजापूर तालुका कृषी अधिकारी आढाव यांचे शेतकऱ्यांना आवाहन

तालुक्यात 135000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित

वैजापूर ,१८ जून  /प्रतिनिधी :- तालुक्यात अद्याप पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. आतापर्यंत 44 मि.मी.पाऊस तालुक्यात झाला असून शेतकऱ्यांनी खरीप पिकाच्या पेरणीसाठी घाई करू नये. पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी असे आवाहन वैजापूर तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी केले आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकाच्या पेरणीसाठी घाई करू नये. पेरणी योग्य पाऊस (75 ते 100 मि.मी.पाऊस) झाल्यानंतर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी. आज रोजी पर्यंत तालुक्यात 44 मिमी पर्जन्यमान झाले आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 526 मि.मी. आहे. खरीपामध्ये 135000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे. तालुक्यामध्ये पुरेसे बियाणे व खते उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी दुकानदाराकडूनच बियाणे, खते व औषधी खरेदी करावेत. दुकानदारांकडून पक्के बिल घ्यावे. बॅग वरील किमतीपेक्षा जादा रक्कम देऊ नये. बियाण्याची पिशवी, लेबल व बिल जपून ठेवावे. बियाणे/खते/औषधी बाबत काही तक्रार असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा. पेरणी करताना रासायनिक, तसेच जैविक बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. रासायनिक खतांचा जमीन सुपीकता निर्देशांकानुसार संतुलित वापर करावा. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आढाव यांनी केले आहे.