पर्यटक निवासांमध्ये साजरा होणार योग दिन

औरंगाबाद ,१६ जून /प्रतिनिधी :- योगाचा प्रचार व प्रसार वाढवून योगमय वातावरण निर्माण व्हावे. योगदिनाची जागृती करून आरोग्य सुदृढ कसे राखता येईल यांची पर्यटकांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाचे औचित्य साधत 21 जून रोजी पर्यटक निवासामध्ये जागतिक योगदिन साजरा करण्यात येत आहे. जागतिक योग दिनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत येत असलेल्या सर्व पर्यटक निवासांमध्ये वास्तव्यास आलेल्या पर्यटकांना एकत्रितपणे काही वेळ योगासने करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच पर्यटक निवासात कार्यरत असलेल्या प्रत्येक कर्मचारी वर्गाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करावा. यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने कळविले आहे.

2022 या वर्षाची थिम (मानवतेसाठी योग) पाहता, योग माणसांना आपसात जोडून परस्पर प्रेम आणि सद्भावना विकसित करतो. त्यामुळे महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये वास्तव्यास आलेल्या विविध धर्मांचे लोक जाती, पंथ आणि देशप्रेमाच्या भावनेने प्रेम, सद्भवाना आणि आत्मीयतेने योग करण्यास मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने महामंडळाच्या सर्वच पर्यटक  निवासांमध्ये जागतिक योगदिन साजरा करण्याबाबतची आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांनी दिल्या आहेत.

निसर्गरम्य ठिकाणी आणि समुद्राच्या किनारी असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये योगा करणे ही एक अनोखी पर्वणी असुन त्याचा पर्यटकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.

पर्यटक निवासांच्या परिसरातील स्थानिक स्तरावरील योग प्रशिक्षण संस्थेस किंवा व्यक्तीस पर्यटक निवासात बोलावून वास्तव्यास येणाऱ्या पर्यटकांना योगाचे जीवनामधील महत्त्व, योगाचे प्रकार, योग केल्याचे शरीरास त्याचा होणारा फायदा तसेच आजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात मनाच्या एकाग्रतेसाठी योग महत्त्वाचा आहे.

सध्याच्या वातावरणात कोरोना सारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी करणे आणि निरोगी जीवन शैलीबरोबरच निसर्गाचा आणि पर्यटनाचा आनंद घेणे यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे अन्नपदार्थ असणारे रुचकर जेवण आणि योगोप्रचार याबाबत मार्गदर्शन शिबिर पर्यटक निवासात येणाऱ्या पर्यटकांसाठी आयोजित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कोरोना संसर्गातून सावरलेल्या पर्यटकांना  आयुर्वेदिक उपचार पद्धती आणि योगोपचार याबाबत माहिती देणे, योगा सत्र सुरू करणे, त्रासलेल्या आणि मनस्वास्थ भरकटलेल्या मनाला शांती देण्यासाठी मेडिटेशन सेंटर सुरु करणे, अशा विविध सुविधा आगामी काळात पर्यटकांसाठी उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येणार आहे, असेही महामंडळाने कळविले आहे.