हिंगोलीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू:औरंगाबाद खंडपीठाची पोलिसांना नोटीस

औरंगाबाद ,१५ जून /प्रतिनिधी :- हिंगोली येथील २६ वर्षीय तरुणाच्या गूढ आणि संशयास्पद मृत्यू प्रकरणी दाखल फौजदारी याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.सारंग व्ही. कोतवाल आणि न्या. भारत पी. देशपांडे यांनी प्रतिवादी राज्याचे गृहसचिव, विशेष पोलिस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, हिंगोलीचे पोलिस अधिक्षक आदींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
हिंगोली येथील मस्तान शाहनगरचे राहिवाशी पठाण इस्माईलखान यांनी अ‍ॅड्. सईद एस. शेख यांच्यामार्फत खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली असून याचिकेनुसार त्यांचा विवाहित मुलगा इरफानखान यास ३० सप्टेंबर २१ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याच भागात राहणारे भरत शंकर यादव, रोहित राजु यादव, सोमनाथ अशोक चंदनशिव आणि विठ्ठल विष्णु चंदनशिव यांनी पार्टी करण्यासाठी नेले होते. यानंतर मात्र इरफान घरी परतलाच नाही. त्यामुळे १ ऑक्टोंबर २१ रोजी इस्माईलखान पठाण यांनी इरफानखान हरवल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल केली.
२ ऑक्टोंबर २१ रोजी हिंगोलीपासून २० किलोमिटर अंतरावर असलेल्या सोडेगाव, सालेगाव भागात कायाधु नदी पात्रात इरफानचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्याच्या अंगावर विविध जखमा होत्या व त्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत होता. यानंतर इस्माईलखान यांनी वारंवार पोलिसांकडे लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या. तसेच वारंवार उपरोक्त चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. मात्र राजकीय दबावापोटी पोलिसांनी गुन्हे दाखल न करता प्रकरण दाबण्याचा प्रयत्न ेकेला. त्यामुळे त्यांनी ही याचिका दाखल केली. प्राथमिक सुनावणीनंतर खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावत याचिकेतील आरोपांविषयी खुलासा करण्यासाठी जबाब दाखल करण्याचे आदेश दिले. प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जुलै २२ रोजी ठेवली आहे. याचिकाकत्याच्या वतीने अ‍ॅड. सईद एस. शेख यांनी काम पाहिले. तर शासनाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील एस. डी. घायाळ यांनी बाजु मांडली.