अल्पवयीन मुलीवर बलात्‍कार; तब्बल सहा महिन्‍यांनी आरोपी अटकेत

औरंगाबाद ,१५ जून /प्रतिनिधी :- प्रेमाचा हवाला देत अल्पवयीन मुलीवर तिच्‍याच घरात बलात्‍कार करणाऱ्या तरुणाच्‍या पुंडलिकनगर पोलिसांनी तब्बल सहा महिन्‍यांनी मंगळवारी दि.१४ रात्री मुसक्या आवळल्या. ऋषीकेश रविंद्र जाधव (२३, रा. पुंडलिकनगर, गारखेडा परिसर) असे आरोपीचे नाव असून त्‍याला १७ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश जिल्हा व सत्र न्‍यायाधीश व्‍ही.बी. पारगावकर यांनी बुधवारी दि.१५ दिले.

प्रकरणात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्‍या वडिलांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, १७ जानेवारी रोजी रात्री फिर्यादी हे आई, आजी, भाची आणि पीडितेसह जेवण करुन झोपी गेले होते. मध्‍यरात्री एक वाजेच्‍या सुमारास पीडीता घरात न दिसल्याने फिर्यादी दरवाज्या उघडण्‍यासाठी आले मात्र दरवाजा बाहेरुन लावलेला असल्याने फिर्यादीने खिडकीत हात घालून दरवाजा उघडला. तेंव्‍हा घरापासून काही अंतरावर पीडिता व आरोपी उभे दिसले. फिर्यादीने त्‍यांना पकडण्‍याचा प्रयत्‍न केला मात्र दोघांनी तेथून धूम ठोकली. प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

गुन्‍ह्याचा तपासादरम्यान पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेत चौकशी केली तेंव्‍हा तिने खोटा जबाब दिला. त्‍यानंतर पोलिसांनी तिला विश्‍वास घेत विचारपूस केली असता तीने पुरवणी जबाब दिला की, आई-वडिलांचे नेहमी भांडण होत असल्याने ते वेगवेगळे राहतात. पीडिता ही आईकडे राहण्‍यासाठी होती. मात्र ४ डिसेंबर रोजी पीडितेची आईसोबत भांडण झाल्याने पीडिता वडीलांकडे राहण्‍यासाठी आली होती. तत्पूर्वी नोव्‍हेंबर २०२१ पासून पीडिता व आरोपी हे एकमेंकाना ओळखत होते, त्‍यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. तेव्‍हापासून ते ऐकमेकांना भेटत होते.

दरम्यान पीडिता ही वडिलांकडे जाण्‍यासाठी आल्यानंतर पीडितेने आजीच्‍या मोबाइल वरुन आरोपीला फोन करुन भेटण्‍यासाठी बोलावले. त्‍यानूसार रात्री १२ वाजेच्‍या सुमारास आरोपी पीडितेला भेटण्‍यासाठी आला. पीडितेने हॉलच्‍या दरवाज्याला बाहेरुन कडी लावली व गेटचे कुलूप उघडून त्‍याला रिकामा असलेल्या घराच्‍या तळमजल्‍यात आरोपीला थांबवले. तेथे आरोपीने प्रेमाचा हवाला देत तिच्‍यावर बलात्‍कार केला. एक वाजेच्‍या सुमारास पीडितेला तिच्‍या वडीलांचा आवाज आल्याने दोघे घाबरले. आरोपीला तेथुन पळून जातांना फिर्यादीने पाहिले, त्‍यामुळे फिर्यादीने त्‍याचा पाठलाग केला. तर एकेकडे वडील आपल्याला मारतील या कारणामुळे पीडितेने देखील घरातून पळ काढला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी गुन्‍ह्यातील सीसीटिव्‍ही फुटेजचा तपास करायचा आहे. गुन्‍हा करतेवेळी आरोपीने परिधान केलेले कपडे जप्‍त करायचे आहेत. आरोपीला गुन्‍ह्यात कोणी मदत केली काय याचा देखील तपास करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.