हा मोदी आणि शहा यांच्या मार्गदर्शनाचा विजय – नारायण राणे

सिंधुदुर्ग ,१२ जून /प्रतिनिधी :- राज्यसभेच्या जागांवर भाजपने मिळवलेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा विजय आहे. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यानी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडवे येथे भाजपचा विजयी जल्लोष करण्यात आला त्यांनतर झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. राणे बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा देऊन बाजूला व्हावे असे नारायण राणे यांनी सांगितले.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांशी पडवे येथे संवाद साधला यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक,जिल्हाध्यक्ष राजन तेली,जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते. राज्यसभा निवडणूकीमध्ये भारतीय जनता पार्टीने मिळविलेल्या विजया मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्यातील आमचे आमदार नितेश राणे यांचे अभिनंदन करण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते जल्लोष करण्यासाठी एकत्र आले होते. राणे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने हा महत्वाचा विजय मिळविला. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपा नेत्याच्या श्रमाचे फळ मिळाले. सर्व भाजपा आमदारांनी निष्ठेचे दर्शन घडविले. पक्षप्रति असलेली निष्ठा,श्रद्धा, प्रामाणिकपणा कसा हे आमदार जगताप, आमदार टिळक यांनी आजारी असतांना सुद्धा मतदान करून दाखवली त्याचे मी अभिनंदन करतो. असे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

यावेळी राणे यांनी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणले, सत्तेला त्तेला १४५ मते लागतात,तुम्ही अल्पमतात आहात त्यामुळे राजीनामा द्या आणि बाजूला व्हा.सत्ताधारी आणि विरोधक हे लोकशाहीतील नाते सुद्धा तुम्ही धुळीला मिळवले, तुमचे सत्तेतील आठ-आठ, नऊ-नऊ आमदार फुटतात याचा अर्थ तुमच्यावर विश्वास आता शिवसेनेकडे राहिलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाजूला व्हावे. सत्तेवर राहायचा नैतिक अधिकार तुम्हाला राहिलेला नाही. आम्ही भारतीय जनता पार्टी विरोधात असून सुद्धा एकसंघ आमदार ठेवले. त्यामुळे तुम्ही अल्पमतात आला आहात. सत्तेवरून बाजूला व्हावा.असे आवाहन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.

राणे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी भाषा वरपरिली, ज्या भाषेत विरोधीपक्ष नेते फडणवीस याच्यावर टीका केली, ती मुख्यमंत्रीपदाला शोभणारी नाही. छत्रपती शिवराय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू,फुले,सावरकर,टिळक, याच्या राज्यात मुख्यमंत्री जी भाषा वापरतात ती भाषा संसदीय नाही. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांची नामुष्की आणि बेअब्रू देशात झाली आहे. शरद पवार यांनी भाजपाच्या विजयाने पराभवाचा धक्का नाही असे सांगतानाच देवेंद्र फडणवीस यांनी माणसे जपली,आमदार सांभाळले, म्हणून विजय झाला अशी प्रतिक्रिया दिली हा माणुसकीचा धर्म पाळला. चांगल्याला चांगले म्हणतात. त्याच्याकडुन बोध घ्या, असा सल्ला देखील राणे यांनी दिला.

संजय राऊत अभिनंदन करेल या वृत्तीचा माणूस नाहीच, मात्र यांचे गुरू असलेल्या शरद पवार यांची प्रतिक्रिया त्यांनी वाचावी. तुमच्या प्रतिक्रियेची आम्हाला आवश्यकता नाही. खासदार राऊत हे मुख्यमंत्री पदासाठी टपून बसलेला माणूस आहे. त्याला वाटत आपण मुख्यमंत्री होणार. ती स्वप्ने राऊत पाहत आहे. मात्र असे कधीही होणार नाही. यापुढे १८ नाहीच तर ६ सुद्धा खासदार निवडून येणार नाहीत. २०२४ ला २० सुद्धा संख्या आमदारांची गाठता येणार नाही. अशी टीका राणे यांनी केली.

यावेळी ऊपस्थित असलेल्या केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी देखील या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस याना देऊन येणाऱ्या निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी येईल, असा विश्वास व्यक्त केला.