कोरोना रोगाचा धोका अजून टळलेला नाही,लोकांना सजग राहण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

  • कारगिल विजय दिवसानिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा
  • लोकमान्य टिळक हे असीम प्रेरणेचा स्त्रोत: पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, 26 जुलै 2020

कारगिल विजय दिवसाला आपल्या सैन्यदलाच्या मनोधैर्याचे आणि शौर्याचे प्रतीक संबोधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित करताना आज मोदी यांनी वीर सैनिकांना आणि त्यांच्या मातांना नमन केले. ते म्हणाले की 21 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारतीय सैन्याने कारगीलमध्ये विजयाचा झेंडा रोवला. यावेळी पंतप्रधान म्हणाले की ज्या परिस्थितीमध्ये आपण कारगीलमध्ये विजय मिळवला तो हा देश कधीही विसरू शकणार नाही.  भारतीय भूमी बळकावण्याचे दुस्साहस करत पाकिस्तानने भारतामध्ये त्यावेळी आगळीक केली, जेव्हा भारत मैत्रीचे नाते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होता.पंतप्रधानांनी यावेळी सैन्यदलाच्या शौर्याचे कौतुक केले ज्यामुळे संपूर्ण जगाला भारताची ताकद दिसून आली.

येत्या 1 ऑगस्ट रोजी असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी ची आठवण करून देत त्यांनी लोकमान्य टिळकांचे स्मरण करून त्यांना असीम प्रेरणेचा स्त्रोत असे संबोधले.

पंतप्रधान म्हणाले की सर्व लोक कारगिल विजयाची आठवण काढत आहेत. ते आपल्या वीर सैनिकांना नमन करत आहेत आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली देत आहेत. त्यांनी युवकांना आवाहन केले की त्यांनी आपल्या सैनिकांच्या वीर कथा आणि शौर्याचा देशभर प्रचार-प्रसार करावा त्याच वेळी त्यांनी www.gallantryawards.gov.inया संकेत स्थळाला भेट देऊन तेथून माहिती गोळा करण्याचे ही आवाहन केले.

यावेळी पंतप्रधानांनी आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी कारगिल युद्धादरम्यान लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाच्या आठवणींना उजाळा दिला. वाजपेयींनी  त्यावेळी गांधीजीच्या एका मंत्राची देशाला आठवण करून दिली होती ज्यानुसार द्विधा मनःस्थितीत असताना निर्णय घेण्यासाठी देशातील गरिबातल्या गरीब व्यक्तीच्या कल्याणाचा विचार करण्याची सूचना त्यांनी केली होती. अटलजी म्हणाले होते की कारगिल युद्धाने आपल्याला आणखी एक मंत्र दिला ज्यानुसार आपण निर्णय घेते क्षणी हा विचार करू शकतो की आपल्या निर्णयामुळे आपल्या सैनिकांचा आदर राखण्यास मदत होणार आहे का?

पंतप्रधान पुढे म्हणाले की देश कोरोना विरुद्धचा लढा एकत्र होऊन लढतो आहे आणि रुग्ण बरा होण्याचा आपला दर तर कित्येक देशांपेक्षा चांगला आहे. एक देखील मृत्यू जरी दुःखदायक असला तरी आपण लाखो लोकांचे प्राण वाचवण्यात यशस्वी ठरलो आहोत. पंतप्रधानांनी या वेळी लोकांना सजग राहण्याचे आवाहन केले कारण रोगाचा धोका अजून टळलेला नाही, त्यांनी लोकांना मास्क वापरण्याचे देखील आवाहन केले.

यावेळी मोदी म्हणाले की आपल्या युवक आणि युवतींनी या रोगापासून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची शपथ घेतली पाहिजे त्यांनी देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करण्याचेही युवकांना आवाहन केले.

देशातील ग्रामीण भागांमध्ये या रोगाशी लढण्यासाठी केल्या जात असणाऱ्या विविध प्रयत्नांची यावेळी पंतप्रधानांनी प्रशंसा केली आणि जम्मू मधल्या सरपंच बलबीर कौर  गांदरबालमधल्या सरपंच जैतुना  बेगम यांची त्यांनी उदाहरणे दिली. या रोगाशी लढण्यासाठी देशातले युवक आणि महिला कसे नवनवे प्रयोग करत आहेत तेदेखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले. यावेळी त्यांनी बिहारमधल्या मधुबनी चित्रकला असलेल्या मास्क चे उदाहरण दिले तसेच त्यांनी अभिनव शेती अंतर्गत लडाख मधल्या जर्दाळूचे तर कच्छ मधल्या ड्रॅगन फ्रुटचा उल्लेख केला.

पंतप्रधानांनी जनतेला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आणि येत्या 7 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या निमित्ताने स्थानिक वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले.

गावांमधून तसेच छोट्या शहरांमधून पुढे येणाऱ्या प्रतिभावान युवक-युवतींचे पंतप्रधानांनी यावेळी कौतुक केले.

बिहार आणि आसाम मधल्या पूरस्थितीशी लढणाऱ्या प्रदेशांना देश तुमच्या पाठीशी उभा आहे असे आश्वस्त देखील केले. सुरिनामचे राष्ट्रपती श्रीयुत चन्द्रिका प्रसाद संतोखी यांचे त्यांनी देशाच्या वतीने अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *