वैजापूर – गंगापूर चौफुलीवरील पेट्रोल पंपावर ट्रक चालकावर चाकूने हल्ला ; दोन जण पोलिसांच्या ताब्यात

वैजापूर ,१२ जून  /प्रतिनिधी :- किरकोळ कारणावरुन ट्रक चालक व क्लिनरने दुसऱ्या ट्रक चालकावर चाकुने हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना नुकतीच गंगापूर चौफुलीवर पेट्रोल पंपावर घडली. किरण काकासाहेब शिंदे (21 रा.रोटेगाव) असे जखमी तरुणांचे नाव असून त्याला उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.‌ 

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून ते छत्तीसगढ राज्यातील रहिवासी आहेत. किरण हा रात्री आठच्या सुमारास हॉटेलमध्ये जेवण करुन गंगापूर चौफुली येथील एका पेट्रोल पंपावर वाहनात डिझेल टाकण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्या ठिकाणी दुसऱ्या ट्रकमध्ये डिझेल टाकण्याचे काम सुरु होते. डिझेल भरल्यानंतर किरणने त्या ट्रक चालकाला ट्रक बाजुला घेण्यास सांगितले. त्यांचा राग धरत ट्रक चालक हातात टॉमी घेऊन खाली उतरला व शिविगाळ केली. त्याने शिंदे यास टॉमीने मारहाण केली. दुसऱ्या आरोपीने हातातील चाकूने पोटात वार करुन शिंदे यास गंभीर जखमी केले. याप्रकरणी शिंदे याने फिर्याद दिल्यानंतर आरोपींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक सिंघल करीत आहेत.