ढेकू नदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

वैजापूर ,१२ जून  /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागातून वाहत असलेल्या ढेकु नदीच्या पात्रातुन मोठ्या प्रमाणावर अवैध वाळुचा उपसा होत असल्याचे समोर आले आहे. शिऊर पोलिस ठाण्याच्या पथकाने ढेकु नदी पात्रात शनिवारी (ता.11) सायंकाळी छापा टाकला.

यावेळी नदीपात्रातुन शासनाला कुठलीही रॉयल्टी न भरता एकुण सहा ट्रॅक्टरमध्ये वाळु भरुन चोरी होत असल्याचे निदर्शनास आले.‌ पण पोलिसांना पाहून चार ट्रॅक्टर चालकांनी तेथून पळ काढला. दोन ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडुन अकरा लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर व दहा हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळु असा अकरा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल या हस्तगत केला. 
राहुल उत्तमराव जाधव व मच्छिंद्र शामराव जाधव दोघे (रा. पिंपळगाव खंडाळा) अशी त्यांची नावे आहेत. समाधान नारायण जाधव, हरिभाऊ बाळा जाधव, वाल्मिक केशवराव जाधव व गणेश वाल्मिक काटे अशी अन्य ट्रॅक्टर चालकांची नावे असून पैलिस त्यांचा शोध घेत आहेत. ही कारवाई पिंपळगाव खंडाळा शिवारात सिंधी नाला फाटा ते बळ्हेगाव रस्त्यावर ढेकु नदीच्या पुलाखाली नदीपात्रात करण्यात आली. शिऊर ठाण्याचे प्रभारी एपीआय संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार अमोल कांबळे, पोलिस उपनिरीक्षक योगेश पवार, नागटिळक, पोलिस नाईक गणेश गोरक्ष, पोलिस नाईक सुभाष ठोके, विशाल पैठणकर यांच्या पथकाने केली.