शांततामय, विकसित जम्मू-काश्मीर ही केंद्र सरकारची सर्वोच्च प्राथमिकता : रामदास आठवले

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर इथे विकासाची कवाडे खुली झालीत: रामदास आठवले

जम्मू  ,११ जून /प्रतिनिधी :-केंद्र सरकारला शांततामय आणि विकसित जम्मू काश्मीर हवे असून, सर्वच आघाड्यांवर जम्मू काश्मीरचा सर्वांगीण विकास करण्यास सरकार कटिबद्ध आहे, अशी माहिती, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री, रामदास आठवले यांनी आज दिली. जम्मूच्या संमेलन केंद्रात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

2019 साली केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर, या भागात विकासाची कवाडे खुली झाली आहेत. याचा प्रत्यय आपल्याला यातूनच येतो की आता इथे केंद्राच्या सर्व योजना, जसे की प्रधानमंत्री आवास योजना, जन धन योजना, मुद्रा योजना, उज्ज्वला योजना, शिष्यवृत्ती योजना,अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या सर्व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरु झाली आहे.

अनेक केंद्रीय योजनांची इथे 100 टक्के अंमलबजावणी सुरु आहे. जम्मू काश्मीरमधल्या लोकांना, सर्व आघाड्यांवर मग ते स्वतःचे घरकूल असो, उपजीविका असो, या सगळ्या सुखसुविधा देण्यास सरकार पूर्ण कटिबद्ध असल्याचाच हा पुरावा आहे. सरकारला इथे सामाजिक स्थैर्य निर्माण करायचे आहे.

या दौऱ्यात रामदास आठवले यांनी जम्मू आणि काश्मीरमधील समाज कल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह, समाज कल्याण योजनांच्या अंमलबजावणीशी संबंधित आढावा बैठक घेतली. या बैठकीला, समाज कल्याण विभाग, जम्मू आणि काश्मीरचे महासंचालक विवेक शर्मा आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जम्मू येथील हरी निवास पॅलेस येथे होणाऱ्या नेल्सन मंडेला नोबल शांतता पुरस्कार सोहळ्यातही आठवले सहभागी होणार आहेत.