अ‍ॅथलेटिक्स, जलतरणात पाच सुवर्णपदके; खो-खो, टेनिसमध्ये महाराष्ट्राची आगेकूच

पंचकुला : खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचा आजही पदकांची मालिका सुरूच आहे. अॅथलेटिक्समध्ये तीन सुवर्ण, एक रौप्य पदक मिळाले. जलतरणात दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदके आली. खो-खोमध्ये मुला-मुलींच्या संघांनी विजयी सलामी देत आगेकूच केली. टेबल टेनिसमध्ये सायली राजेश वाणी व प्रिथा प्रिया वर्तीकर यांनी विजय मिळवले.

जलतरणमध्ये ४०० मीटर फ्रीस्टाईल – आन्या वाला (मुंबई) हिने सुवर्ण, १०० मीटर बटरफ्लाय – अपेक्षा फर्नांडीस हिनेही सुवर्ण पदक जिंकले. १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये पुण्याच्या उत्कर्ष गौर व १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये मुंबईच्या पलक जोशीने कांस्य पदकावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या पदकतालिकेत आज एकंदर पाच सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य पदकांची भर पडली. वेटलिफ्टिंगमध्ये मुलांच्या संघाला सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले. मुलींच्या ४ बाय ४०० रिलेच्या संघाने विजेतेपदक उंचावले.

२०० मीटर धावण्यात सातारच्या सुदेष्णा शिवणकरने आजही सुवर्ण कामगिरी केली. अवंतिका नरळे हिला याच प्रकारात रौप्यपदक मिळाले. मुलांमध्ये आर्यन कदम (पुणे) याने २०० मीटरमध्ये सुवर्ण पदक उंचावले.

मुलींच्या रिलेच्या विजेत्या संघात रिया पाटील (कोल्हापूर), वैष्णवी कातुरे (नाशिक), प्रांजली पाटील (मुंबई), शिवेच्छा पाटील (पुणे) यांचा समावेश होता. त्यांच्या संघाने सुवर्ण जिंकले. उद्या मल्लखांबमध्ये सांघिक आणि वैयक्तिक पदके मिळण्याची आशा आहे.

पदकतालिका

हरियाना  – ३३ सुवर्ण, २७ रौप्य, ३६ कांस्य (एकूण ९६)

महाराष्ट्र – ३० सुवर्ण,  २८ रौप्य, २५ कांस्य (एकूण ८३)

मणिपूर – १३ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य (एकूण १८)

 खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अ‍ॅथलेटिक्सचे मैदान गाजवले. ४ बाय ४०० मीटर रिलेमध्ये मुलींनी सुवर्णपदक पटकावले. २०० मीटर धावण्यात सातारच्या सुदेष्णा शिवणकरने आज पुन्हा सुवर्णपदक उंचावले. दुसरी स्पर्धेक अवंतिका नरळे हिला याच प्रकारात रौप्यपदक मिळाले. मुलांमध्ये आर्यन कदम (पुणे) याने २०० मीटरमध्ये सुवर्ण पदक उंचावले. मुलांचा रिले संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. हरियानाच्या संघाने विजेतेपदकाचा चषक मिळवला. मध्य प्रदेश आणि तामीळनाडूला अनुक्रमे उपविजेतेपद मिळाले.


मुलींच्या रिलेच्या विजेत्या संघात रिया पाटील (कोल्हापूर), वैष्णवी कातुरे (नाशिक), प्रांजली पाटील (मुंबई), शिवेच्छा पाटील (पुणे) यांचा समावेश होता. मुलींमध्ये हरियानाला चमक दाखवता आली नाही. तमीळनाडू आणि कर्नाटकच्या संघाला उपविजेतेपद मिळाले.

मुलींच्या रिलेच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. ४ बाय ४०० मीटरमध्ये ४. ०२. ७६ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्ण पदक पटकावून महाराष्ट्राची हरियानात मान उंचावली. यात ८ सुवर्ण, ३ रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश होता. सुदेष्णा शिवणकर आणि अवंतिक नरळे यांनी वैयक्तिक तीन-तीन पदके पटकावली. सुदेष्णाने १०० मीटर धावण्यात नोंदवलेली (११.७९ सेकंद) वेळ तिचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स आहे. तिने २०० मीटरमध्ये २४.२९ सेकंदाची वेळ नोंदवली.

४ बाय १०० मीटर रिलेमध्येही मुलींच्या संघाने सुवर्णपदक घेतले आहे. त्यात साक्षी चव्हाण (औरंगाबाद), सुदेष्णा शिवणकर (सातारा), अवंतिका नरळे (पुणे), सिया सावंत (मुंबई) या खेळाडूंचा रिलेचा संघ होता. मंगळवारी यांच्या संघाने मैदान गाजवले होते.
———–

दुखापतीतून पदकाकडे

मुलींच्या १०० मीटर रिले संघात सहभागी झालेली औरंगाबादची साक्षी चव्हाण काही महिन्यांपूर्वी दुखापतग्रस्त होती. तिच्या गुडघ्याला मोठी दुखापत होती. त्यातून ती नुकतीच सावरली आहे. गेल्या वर्षी तिला स्पर्धा खेळता आली नव्हती. खेलो इंडियात सहभागी होण्यापूर्वी ती गुजरातमध्ये स्पर्धा खेळली. मात्र, त्या स्पर्धेत तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. खेलो इंडियात ती रिलेच्या संघात दुसऱ्या लेगला धावली. महाराष्ट्राने घेतलेली आघाडीने तिने कायम ठेवली. दुखापतीतून सावरून पदक उंचावल्याचा आनंद खूप मोठा असल्याची भावना साक्षीने व्यक्त केली.

यांनी गाजवले बारावीचे मैदान

दरम्यान खेळासोबतच बारावीच्या निकालातही या खेळाडूंनी आपली छाप पाडली. आयएससी पॅटर्नमधून शिकत असलेल्या आर्यन कदम याला बारावी परीक्षेच्या पहिल्या सत्रात ८२ टक्के गुण मिळाले. तर बुधवारी बारावी परीक्षेच्या निकालात आर्यन पाटील (५६ टक्के, पनवेल) आणि सार्थक शेलार (५० टक्के, कोल्हापूर) यांनीही चांगले गुण घेतले. तर आर्यन कदमने ४ बाय १०० रिलेमध्ये सुवर्ण आणि २०० मीटरमध्येही सुवर्ण कामगिरी केली आहे. आर्यन पाटीलला उंच उडीत रौप्य मिळाले. सार्थकला रिलेमध्ये सुवर्ण पदक मिळाले. मुलींच्या संघातील वाणिज्य शाखेतील वैष्णवी कातुरे मैदान गाजवताना ६८.३३ टक्के गुण मिळवले. कॉम्प्युटर सायन्सला असलेल्या रिया पाटील ७५.१७ टक्के गुण मिळाले.