नामर्दांचं हिंदूत्व आम्हाला शिकवू नका, उद्धव ठाकरे यांचं भाजपवर टीकास्त्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा

Image

औरंगाबाद ,८ जून /प्रतिनिधी :-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर सभेत बोलताना भाजपवर जोरदार टीका केली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर बोलताना भाजपवर टीकास्त्र सोडलं.

औरंगाबादमध्ये झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळ बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्रात सर्व सुरळीत चाललं असताना भाजप कुणाला तरी सुपारी देतं, मग कोणाचा तरी भोंगामध्ये येतो, कोण तरी हनुमान चालिसाचा मुद्दा काढतं, कोणीतरी थडग्यावर डोकं टेकतं असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Image

रोज कुणाच्या तरी स्वप्नात उद्या सरकार पडणार, परवा सरकार पडणार, सरकार पडल्यानंतर मीच पुन्हा येणार असं ज्यांना वाटत होते, ते आता चिमटे काढून बघतायत, अडीच वर्ष झाली, ज्याला प्रशासनाचा अनुभव नव्हता,  असा माणूस मुख्यमंत्रीपदी बसला आहे, आणि महाराष्ट्राला पुढे नेणारी, अडीच वर्ष पूर्ण केली आहेत. 

ही वाटचाल नव्हती , केवळ तुमचं प्रेम आणि त्याही पेक्षा मोठा तुमचा विश्वास होता असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळणं तेही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत. गेली पंचवीस तीस वर्ष मित्र म्हणून ज्यांना आपण मांडीवर बसवलं होतं, तो आपल्या  उरावर नाचायला लागला आणि ज्याच्याबरोबर आपण भांडत होतो त्यांनी आपल्याला मान सन्मान देऊन सरकारमध्ये महाराष्ट्राचा विकास करण्याची संधी आणि साथ दिली आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Image

जो मित्र होता तो इतका हार्डवैरी झालेला आहे, आणि जे वैरी होते ते मित्र झाले आहेत. ज्या शिवसेनाप्रमुखांनी तुमच्या नेत्यांना वाचवलं आहे, ती शिवसेना तुमच्या डोळ्यात खुपायला लागली. सरकार पडत नाही म्हटल्यावर कोणाच्या मागे ईडी लाव, कोणाच्या मागे सीबीआय लाव, पण इकडे ईडी आणि सीबीआय लावण्यापेक्षा काश्मिरमध्ये जे पंडीतांना गोळ्या घातल्या जात आहेत तिकडे धाडी टाकून दाखवा, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

‘महागाई वाढतेय, रुपया घसरतोय, पण आम्हाला चिंता कसली आहे. कोणत्या मशिदीखाली शिवलिंग आहे. ज्ञानव्यापी मंदिराखाली काय आहे. आमचं हिंदुत्व मोजणारे तुम्ही कोण? चला होऊन जाऊदे, शिवसेनेने हिंदुत्वासाठी काय केलं आणि भाजपने हिंदुत्वासाठी काय केलं हे खुल्या मंचावर होऊन जाऊ दे.’

‘कोणाला हिंदुत्व शिकवताय, हा गेल्या काही दिवसांपूर्वीचा इतिहास आहे. त्या वेळेस शिवसेनाप्रमुखांनी जबाबदारी घेतली नसती तर, अमरनाथ यात्रेवर जेव्हा गडांतर आलं होतं, तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी इथून वाघाची डरकाळी मारली नसती तर आज हिंदुत्वाच्या जोरावर तुम्ही दिल्ली काबिज करु शकला असतात काय हे आधी स्वत:ला विचारा आणि मग आमच्या अंगावर या?’

‘काश्मिरमध्ये हिंदुंना घरात घुसून गोळ्या मारतायत, पण यांना त्याचं काही घेणं देणं नाही. यांना नको तिकडे काड्या लावायच्या आहेत. तिथे काश्मिरमध्ये जाऊन हनुमान चालिसाचं पठण करा, उगाच कुठेतरी जाऊन दुधाचा अभिषेक करतायत, हनुमान चालिसा म्हटलं नाही तर हिंदुत्व नाही. हे नामर्दचं हिंदुत्व आमच्याकडे नाही. मर्द असाल तर पहिलं काश्मिरी पंडितांचं रक्षण करा. हिम्मत असेल तर तिकडे जा.’

‘ही शिवसेना म्हणजे शिवसेनाप्रमुखांची नाही असं म्हणतात.  मी उद्धव ठाकरे म्हणून शुन्य आहे मध्ये बाळासाहेब नाव आहे म्हणून मी तुमच्यासमोर आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून तुम्ही माझ्यावर प्रेम करताय.’

‘बाळासाहेबांनी काय सांगितलं होतं मला देवळात घंटा बडवणारा नाही तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदु हवा आहे.’

‘आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, भाजपचे बेलागम सुटलेले प्रवक्ते आहेत त्यांच्या डोक्यात काहीतरी अक्कल घातली पाहिजे. जर तुम्ही आमच्यावर वेडीवाकडी टीका केली आणि उद्या आमचा संयम तुटला  तर तुमच्याच भाषेत तुमच्यावर टीका केल्याशिवाय आमचे प्रवक्ते राहणार नाहीत. ‘

‘आपल्याकडे मैदान पुरत नाही अशी आपली ताकद वाढत आहे. थोड्याच वेळात मुख्ममंत्र्यांची तोफ धडाडणार असं सुरु होतं. पण ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते. ही ढेकणं आम्ही अशी चिरडत असतो, शिवसैनिकांची शक्तीसुद्धा तिकडे वाया घालवायची नाही.’

‘हिंदुत्व आपला श्वास आहे. पाणीप्रश्न मोठा आहे आणि मी जनतेला सामोरे जातोय. मला मूर्ख म्हटलं तरी चालेल. पाणीपुरवठा साठी आम्ही गेली काही दिवस काम करतोय. मी तुम्हाला वचन दिलं आहे,  पाणी मिळणारच, ही योजना अधिकाऱ्यांनी हातात दांडा घेऊन पूर्ण कराव्यात.’

‘आम्ही खोटं बोलत नाही. ते आमचं हिंदुत्व नाही. आमचं हिंदुत्व मोजणारे तुम्ही कोण? चला होऊन जाऊ द्या, कुणी हिंदुत्वसाठी काय केलं ते सांगूंया.’

‘भाजपचे टिनपाट प्रवक्ते’
भाजपच्या एका प्रवक्त्याने प्रेषितांचा अपमान केला, काय संबंध आहे, आपल्या देवदेवतांचा अपमान कुणी करायचा नाही तसं त्यांच्याही देवदेवतांचा अपमान करण्याची तुम्हाला गरज नाही. पण त्या अपमानानंतर सर्व अरब देश एकत्र झाले आणि त्यांनी आपल्या देशाला माफी मागायला लावली. 

राजकीय मतभिन्नता असेल पण ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहे. आपल्या देशाचे पंतप्रधानांचे फोटो कचराकुंडीवर लावले जातात. देशाने का माफी मागायची, गुन्हा केला आहे तो भाजपने केला आहे. त्यांच्या टिनपाट प्रवक्त्यांनी केला आहे. भाजपाचा प्रवक्ता म्हणजे देशाचा प्रवक्ता होऊ शकत नाही असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सुनावलं.