बरे झालेल्यांच्या संख्येचा एका दिवसातील उच्चांक, 36,000 पेक्षा जास्त रुग्णांना घरी सोडण्यात आले


नवी दिल्ली, 26 जुलै 2020
काल बरे झालेल्यांचा एका दिवसातील आत्तापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला. गेल्या 24 तासांत 36,145 कोविड -19 रूग्ण बरे झाले आणि त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या 8,85,576 वर गेली आहे. रुग्ण बरे होण्याच्या दराने जवळपास 64% पर्यंत नवी उच्च पातळी गाठली आहे. आज हा दर 63.92% होता. याचा अर्थ रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून सक्रिय रुग्ण आणि बरे होणारे यातील वाढणारी तफावत कायम राखली जात आहे. ही तफावत 4 लाखांच्या पुढे गेली आणि सध्या ती 4,17,694 आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण सक्रिय (4,67,882) रुग्णांपेक्षा 1.89 पट आहे.
केंद्र सरकारने सर्व राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांना “चाचणी, शोध आणि उपचार” या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या 24 तासांत 4,40,000 पेक्षा जास्त चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आजवर केलेल्या प्रति दशलक्ष चाचण्यांचे प्रमाण 11,805 वर पोहोचले असून, आत्तापर्यंत एकूण 1,62,91,331 चाचण्या करण्यात आल्या आहेत. प्रथमच, सरकारी प्रयोगशाळांनी 3,62,153 नमुन्यांची चाचणी करण्याचा नवा विक्रम नोंदविला आहे. खासगी प्रयोगशाळांमध्ये एकाच दिवसात 79,878 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून हा आजवरचा उच्चांक आहे.
सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या सहभागाने रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने कोविड -19 च्या रुग्णांचे लवकर निदान होऊन त्वरित उपचारांमुळे मृत्यू दर सातत्याने कमी झाला आहे. सध्या तो 2.31% आहे. सर्वात कमी मृत्यूचे प्रमाण असणाऱ्या जगातील देशांमध्ये भारताचा समावेश आहे.
इतर
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गृह निर्माण आणि नागरी कामकाज मंत्रालयाच्या पीएम स्वनिधी योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. 2.6 लाख अर्ज प्राप्त झाले असून 64,000 पेक्षा जास्त अर्जांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.या योजनेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि गती राखण्यासाठी संपूर्ण प्रक्रियेसाठी वेब पोर्टल आणि मोबाईल ऐप द्वारे माहिती तंत्रज्ञांचा वापर करण्यात येत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.
- आज कारगिल विजय दिवस, यानिमित्ताने प्रादेशिक आउटरीच ब्युरो, महाराष्ट्र- गोवा विभाग व पत्र सूचना कार्यालय, पश्चिम विभागाद्वारे ‘वेबीनार’चे आयोजन केले होते. याप्रसंगी निवृत्त कर्नल अमित दळवी यांनी प्रत्यक्ष कारगिल युद्धभूमीवरील प्रेरक प्रसंग कथन केले.
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, संरक्षण विभाग प्रमुख आणि सैन्य व्यवहार विभाग सचिव जनरल बिपिन रावत, सैन्यदल प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, नौदल प्रमुख अॅडमिरल करंबीर सिंह आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यांनी आज येथे कारगिल संघर्ष किंवा ‘ऑपरेशन विजय’ मधील भारताच्या विजयाच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांना राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये जाऊन आदरांजली वाहिली. 26 जुलै 1999 रोजी कारगिलमध्ये भारतीय सशस्त्र दलाचा विजय म्हणजे मजबूत राजकीय, लष्करी आणि मुत्सद्दी कृतीची गाथा आहे. अतिशय अभिमानाने, सन्मानपूर्वक आणि चैतन्यमय वातावरणात संपूर्ण राष्ट्र हा दिवस साजरा करीत आहे.
- भारतीय सैन्य दलाच्या विजयाच्या स्मरणार्थ आणि आपल्या हुतात्म्यांच्या सर्वोच्च बलिदानास आदरांजली म्हणून 21 व्या कारगिल विजय दिवशी पुणे येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकात पुष्पचक्र अर्पण समारंभ आयोजित करण्यात आला होता. शहीद जवानांना सन्मानित करण्यासाठी दक्षिणी कमांडच्या सर्व विभागांच्या वतीने लेफ्टनंट जनरल सी.पी. मोहंती, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ यांनी स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले. दक्षिण कमांड मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ, लेफ्टनंट जनरल डी एस आहुजा आणि मेजर जनरल ए.के. हुक्कू (सेवानिवृत्त) यांनीही पुष्पचक्र अर्पण केले. कोविड -19 महामारीच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन दक्षिण कमांड मुख्यालयाचे निवडक अधिकारी आणि जवान तसेच कारगिल युद्धातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
- केंद्रीय कृषी, आणि शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी 25 जुलै 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. यामध्ये मध्यप्रदेशच्या कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, शास्त्रज्ञ, ग्वाल्हेर येथील राजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विश्व विद्यालयाचे कुलगुरू, आणि अन्य भागधारक सहभागी झाले होते. ग्वाल्हेर-चंबळ प्रांतातील मोठा डोंगराळ भाग कृषी क्षेत्राखाली आणण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. हा महत्त्वाचा प्रकल्प जागतिक बँकेच्या सहयोग आणि पाठिंब्याने पूर्ण करण्यात येईल, असे या बैठकीदरम्यान ठरविण्यात आले. या संदर्भात यापूर्वी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसमवेत बैठकही घेण्यात आली असून, एका महिन्यात प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- आदिवासींच्या हितासाठी आणि विकासासाठी वचनबद्ध असलेल्या संघटनांपैकी एक म्हणून आदिवासी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत ट्रायफेड आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नात अग्रभागी राहिले आहे. सातत्याने पुढाकार घेऊन सुरू असलेल्या उपक्रमांच्या अंमलबजावणी व्यतिरिक्त, ट्रायफेडने आता भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा प्रमुख राष्ट्रीय कार्यक्रम उन्नत भारत मोहिमेसाठी (यूबीए) आयआयटी दिल्लीबरोबर भागीदारी केली आहे.