वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन

मुंबई : आपल्या भारदस्त आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि गेल्या चार दशकाहून अधिक काळ दूरदर्शनवर बातमीदारी करणारे वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या खास आवाजामुळे भिडे हे दुरदर्शनची ओळख बनले होते. त्यांच्या भारदस्त आवाजाच्या जोरावर ते महाराष्ट्रातील घराघरात पोहचले.

विज्ञान शाखेमधून शिक्षण घेतल्यानंतर प्रदिप भिडे यांनी रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेची पदवी घेतली. प्रदिप भिडे यांनी ई मर्क आणि हिंदुस्थान लिवर या बहुराष्ट्रीय कंपन्यात काही काळ जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर ते मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये वृत्तनिवेदक म्हणून नोकरीला लागले. प्रदीप भिडे यांनी ध्वनिमुद्रण स्टुडिओ निर्मिती संस्था सुरु केली. त्या माध्यमातून त्यांनी जाहिरात, माहितीपट आणि लघुपट यावर काम करत आपला ठसा उमटवला.