वित्त मंत्रालयाच्या विशेष सप्ताहानिमित्त केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी प्रकाशित केले इ-पुस्तक- ‘प्रतिध्वनी’

नवी दिल्ली ,७ जून  /प्रतिनिधी :-वित्त मंत्रालयाच्या विशेष सप्ताहानिमित्त प्राप्तिकर विभागाने आज नवी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी ‘प्रतिध्वनी’ नावाचे इ-पुस्तक प्रकाशित केले.

कोविड महामारीच्या काळात उत्पन्न झालेल्या अडचणीच्या परिस्थितीतही प्राप्तिकर विभागाने स्वतःचे रूपांतर सेवाप्रधान संस्थेत करून घेत, त्याचवेळी प्रचंड महसुलाचे संकलनही केल्याबद्दल, राज्यमंत्री डॉ.कराड यांनी यावेळी प्राप्तिकर विभागाचे कौतुक केले. चाणक्याच्या अर्थशास्त्रातील ‘कोष मूलो दंड:’ ही उक्ती उद्धृत करत त्यांनी त्यामागील तत्त्वज्ञान अधोरेखित केले. महसूल / राजस्व हा अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. एक प्रभावी, न्यायोचित आणि पारदर्शक कर-प्रशासन प्रस्थापित केल्याबद्दल त्यांनी विभागाची प्रशंसा केली. विभागाच्या या प्रयत्नांमुळे महसूल संकलनाबरोबरच शाश्वत वृद्धी आणि कार्यक्षम करदाता सेवाही साध्य करता आल्याचे डॉ.कराड यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रकाशित झालेले ‘प्रतिध्वनी” हे इ-पुस्तक म्हणजे देशासाठी एक उत्तम स्मरणिका ठरेल, असा विश्वास व्यक्त करत कराड यांनी  विभागाचे अभिनंदन केले. देशाच्या विकासात प्राप्तिकर विभागाची भूमिका जाहिरातीच्या स्वरूपात जशी प्रतिबिंबित झालेली दिसते, तशीच या पुस्तकामुळे ती ठळकपणे समोर येईल असा विश्वासही राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी व्यक्त केला.