औरंगाबादमधील मृत्यू दर चिंताजनक -शरद पवार 

औरंगाबाद दि. 25, – औरंगाबादमध्येही कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. आवश्यक ती उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. तसेच कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बेड्सची संख्या वाढवण्याची गरज असल्याचंही पवार म्हणाले. जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी शासन निर्देशानुसार यंत्रणा योग्य पद्धतीने काम करत असून मृत्यूदर रोखण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. त्यासाठी उपचार सुविधांमध्ये वाढ करत असताना जिल्ह्याला कोरोनामुक्त करून जनजीवन सुरळीत करण्यात लोकसहभाग महत्त्वाचा आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी औरंगाबादमध्ये सांगितले .    

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना परिस्थितीबाबत आयोजित आढावा बैठकीत राष्ट्रवादी  काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार बोलत होते.यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालक मंत्री सुभाष देसाई, राज्य फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, खा. इम्तीयाज जलील, खा. भागवत कराड, जिल्हा ‍परिषद अध्यक्षा मीना शेळके उपस्थित होते.

यावेळी श्री. पवार म्हणाले, जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी शासन निर्देशानुसार यंत्रणा योग्य पद्धतीने काम करत असून मृत्यूदर रोखण्याचे आव्हाण आपल्यासमोर आहे. त्यासाठी उपचार सुविधांमध्ये वाढ करत असताना जिल्ह्याला कोरोनामुक्त करून जनजीवन सुरळीत करण्यात लोकसहभाग महत्त्वाचा आहे.      राज्यात कोरोना संकटाचा यशस्वी सामना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्व यंत्रणा, अधिकारी, लोकप्रतिनिधी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये लोकांनी स्वयंशिस्त पाळून संसर्ग रोखण्याच्या दृष्टीन योग्य ती खबरदारी घेण्याला विशेष महत्व आहे. लोकांच्या सक्रीय सहभागातूनच कोरोनाचे संकट आपण यशस्वीरित्या परतवू शकतो. लोकांनी घरात सण साजरे करून चांगले उदाहरण उभे केले आहे. याच पद्धतीने यंत्रणांच्या प्रयत्नांना जनतेने कृतीशील पाठिंबा देत स्वयंशिस्तीचे पालन केले तर लवकरच आपण या कोरोनाच्या संकटातून यशस्वीपणे बाहेर पडू, असा विश्वास श्री. पवार यांनी व्यक्त केला.

तसेच राज्य शासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उत्तमरित्या या आपत्ती स्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे. त्यामध्ये राज्य शासनाला येणाऱ्या अडचणी, आवश्यक निधी याबाबत केंद्र सरकारकडे माहिती देण्यासाठी कोरोना रूग्णांची संख्या अधिक असलेल्या जिल्यांना आपण भेट देत असून लोकप्रतिनिधीसोबत तसेच अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेत अडचणी सोडविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. महाराष्ट्राने नेहमी संकटाच्या काळात प्रशासकीय यंत्रणेच्या सोबतीने उत्तम काम करून दाखवलेले आहे. या कोरोना संकटात आरोग्य, महसूल, पोलीस इतर सर्व संबंधित यंत्रणा चांगले काम करत आहे. जिल्ह्यात त्यांच्या प्रयत्नांतून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून संसर्गाचे प्रमाण आणि मृत्युदर शून्यावर आणण्याचे आव्हान आपल्या समोर असून यामध्ये उपचार सुविधांमध्ये वाढ करत असताना लोकांचा सहभाग वाढणे गरजेचे आहे. लोकसहभागातून परिस्थिती यशस्वीपणे हाताळता येते हे मालेगाव आणि औरंगाबाद येथे मोठ्या संख्येने बाधीतांचे प्रमाण होते त्याठिकाणी पहायला मिळत आहे. लोकांच्या सहकार्यातून आज मालेगाव कोरोनामुक्तीच्या जवळ पोहचलेले आहे. त्या पद्धतीने औरंगाबादमध्ये होत आहे.

पूर्ण तयारीनिशी आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्यात सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्राधान्याने काम करावे. औरंगाबाद एक महत्वाचे ठिकाण असून औद्योगिक क्षेत्रातही त्याची ठळक ओळख बनत आहे. ऑटोमोबाईलच्या क्षेत्रात देशस्तरावर औरंगाबादचे महत्वाचे स्थान बनलेले आहे. त्यासोबतच पर्यटन व्यवसायाचे हे महत्वाचे केंद्र आहे. त्यामुळे येथील उद्योगव्यवसायात खंड पडणार नाही याची खबरदारी घ्यावी. औरंगाबादमध्ये पालकमंत्र्यांच्या सूचनांमूळे उद्योग क्षेत्र या सकटकाळातही सुरू राहील. ही चांगली बाब असून राज्यातून स्वत:च्या राज्यात गेलेला कामगार वर्ग दोन-तीन महिन्यापासून हाताला काम नसल्याने पून्हा महाराष्ट्रात येण्याच्या विचारात असून कारखानदारी पूर्ववत चांगली सूरू होईल, त्यासाठी कामगारांचा विश्वास वाढण्याच्या दृष्टीनेही केले पाहिजे. पालकमंत्री जिल्ह्याच्या उपचार सुविधा सक्षम करण्यासाठी राज्यस्तरावर सतत पाठपुरावा करत आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांवून ही लढाई यशस्वी करावी, असे आवाहन श्री. पवार यांनी यावेळी केले.

जिल्ह्यातील रूग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढत असून संसर्गाचे प्रमाण आणि मृत्यूदर कमी होत आहे. कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने सर्व मानकांमध्ये सुधारणा होत आहे, याचपद्धतीने सर्व यंत्रणांनी जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी संघभावनेतून मिशन मोडवर काम करावे, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले की, जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सर्व यंत्रणा अविश्रांतपणे मेहनत घेत आहे. त्यामुळे मृत्युदर कमी झाला असून 3.5 वर आला आहे. तो 1 पेक्षा कमी करण्याचे उद
दीष्ट साध्य करायचे आहे. तर बाधितांचा दर 11 टक्यांवरून 10 टक्यांवर आणावयाचा आहे. यासाठी मिशन मोडवर काम होणे गरजेचे असून यामध्ये जनजागृती महत्वाची आहे. नागरिकांना स्वयंशिस्तीचे पालन करत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जागरूक करणे आणि लोकसहभाग वाढवणे यादृष्टीने यंत्रणांनी काम करावे. असे निर्देशित करून श्री. टोपे म्हणाले राज्य शासन आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणासाठी प्राधान्याने प्रक्रिया राबवत असून घाटीसह मनपाच्या, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सर्व रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांना डॉक्टर, नर्सेस, वार्डबॉईज, टेक्नीशियन ही पदे भरण्याचे अधिकार देण्यात आले असून तातडीने डॉक्टर व इतर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. तसेच गंभीर रूग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी तज्ज्ञांव्दारे दिल्लीसह देशातील इतर भागातून जिल्ह्यातील रूग्णांना टेली आयसीयु सेवा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा, इंफ्रास्ट्रक्चर तयार करावे, तसेच प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यासाठी एनआयव्हीकडे पाठपुरावा सुरू असून ही उपचार सुविधा रूग्णांना उपलब्ध करून द्यावी. त्याचप्रमाणे शासनाने 500 रूग्णवाहिकांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेली असून त्याची निवीदा प्रक्रिया लवकरच पुर्ण होईल. त्यात प्राधान्याने जिल्ह्याला रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासोबतच मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या निधीतून मंजूर झालेल्या रूग्णवाहिका खरेदीबाबतची प्रशासकीय अडचण दूर करून त्या उपलब्ध करून देण्यासाठीही पाठपुरापवा करण्यात येईल. असे श्री. टोपे यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे जिल्ह्यातील आयसीयु बेड, व्हेंटीलेटर, यांची संख्या वाढवावी. स्थानिक पातळीवर आवश्यक औषधी खरेदीसाठीदेखील निधी आणि अधिकार देण्यात आले आहे. तरी तातडीने उपचार सुविधा वाढवाव्यात. शासकीय रूग्णालयांमध्ये उपचार सुविधा वाढवत असतांना खाजगी रूग्णालयात योग्य दरात रूग्णांना उपचार मिळण्यासाठी नियंत्रण ठेवावे. मोठ्या खाजगी रूग्णालयातील एकूण खाटांपैकी दहा टक्के मोफत खाटा आणि दहा टक्के सवलतीच्या दरात राखीव ठेवणे बंधनकारक असून त्यापद्धतीने गरीब रूग्‍णांना उपचार सूविधा प्राधान्याने मिळवून द्याव्यात.

तसेच महात्मा फुले योजना ही योजना सर्वांना लागू असून अशी  योजना महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. तरी जिल्ह्यात कोरोना संकटाच्या काळात गरजूंना अधिकाधिक लाभ या योजनेंतर्गत मिळावा यासाठी योजनेच्या निकषांमध्ये बदल करून योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच या योजनेअंतर्गत पीपीई कीट व मास्क जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून द्यायचे असतात. तरी त्याबाबतचा खर्च रूग्णांच्या देयकात लावल्या जाणार नाही याबाबत नियंत्रण ठेवावे. असे सांगून श्री. टोपे म्हणाले जिल्ह्यातील महिला व बाल रूग्णालय सुरू होण्यासाठी संबंधितांनी पुढील आवश्यक कार्यवाही पुर्ण करावी. तसेच खाजगी दवाखाने सुरू ठेवणे बंधनकारक असून त्याचे पालन न करणाऱ्यांवर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी. जिल्ह्यात चांगल्या प्रमाणात रूग्ण शोधण्याचे प्रमाण वाढवावे. संस्थात्मक विलगीकरणातही वाढ करावी. महानगरपालिकेने नागरिकांसाठी दूरध्वनीव्दारे आरोग्य मार्गदर्शन मदत सेवा उपलब्ध ठेवावी. कोरोनाच्या गंभीर रूग्णांना उपयुक्त ठरणाऱ्या इंजेक्शनची उपलब्धता वाढवावी. गरीब रूग्णांना प्रथम प्राधान्याने इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी यावेळी दिले.

यावेळी  पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यात आरोग्ययंत्रणा मनपा, प्रशासन सर्वजण रात्रंदिवस काम करत चांगल्या पद्धतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहेत. त्यामध्ये दहा दिवसांचा जनता कर्फ्यू लोकसहभागातून यशस्वी झाला. त्यात चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने बाधीतांना वेळीच शोधून काढणे, संसर्ग रोखणेही ग‍तीमानतेने सुरू आहे. आपल्याला मृत्यूदर शुन्यावर आणण्याचे आव्हान यशस्वी करायचे आहे. त्यादृष्टीन लोकप्रतिनिधी आणि सर्व यंत्रणांनी जनसहभागातून अधिक व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणाला मनुष्यबळाच्या पूरेशा उपलब्धतेला पूर्ण करण्याच्या दृष्टीने गतीने रिक्त पदांच्या नियुक्त्या कराव्या. जिल्ह्यातील आयसीयु बेड, व्हेंटीलेटर संख्या वाढवावी. तसेच खाजगी रूग्णालयातील देयकांवर नियंत्रण ठेवत असताना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना संकट काळाच्या दृष्टीने विशेष बाब म्हणून योजनेच्या निकषात बदत करून व्याप्ती वाढवावी. जेणेकरून गरीब रूग्णांना त्याचा या आरोग्य आपली काळात लाभ होईल. सर्वांनी एकत्रित प्रयत्नांतून कोरोना संक्रमण रोखावे आणि पून्हा लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नये. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे अधिक खबरदारीने आता उपाययोजना करणे गरजेचे आहे. अशा सूचना श्री. देसाई यांनी यावेळी केल्या.

यावेळी राज्य फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना संकट काळाच्या दृष्टीने रेशनकार्डची सक्ती न करता गरीब रूग्णांना उपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच रूग्णवाहिकांची संख्या वाढवणे आवश्यक असल्याचे सांगितले.

खा. जलील यांनी घाटी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावीत. तसेच आवश्यक निधीही तातडीने उपलब्ध करुन द्यावा. त्याचबरोबर जिल्हा  महिला व बाल रुग्‍णालय तातडीन सुरू करावेत. जेणेकरून घाटीवरचा भार कमी होण्यास मदत होईल. तसेच खासगी रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांना महात्मा ज्योतीब फुले योजनेअंतर्गत लाभ  मिळाला पाहिजे,  अशी सूचना श्री. जलील यांनी केली. खा.भागवत कराड यांनी प्रशासकीय यंत्रणा चांगले काम करत असून उपचार सुविधांमध्ये वाढ करावी. लॉकडाऊनमध्ये लोकांच्या हाताला काम नसल्यामुळे गरिब लोकांना अन्नधान्य देण्यात आले मात्र वैद्यकीय खर्च ते करु शकत नाही तरी महात्मा फुले योजनेअंतर्गत त्यांना उपचार मिळावे, अशी सूचना श्री. कराड यांनी केली.

आ. हरिभाऊ बागडे यांनी कोरोना साखळी तोडण्यासाठी संसर्गाचा धोका आणि गांभीर्य लोकांना समजावून सांगण्यासाठी लोकप्रबोधन आवश्यक असून परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी  वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी संख्या त्याचबरोबर औषधसाठा पुरेशा प्रमाणात वाढविण्यात यावी, अशी सूचना केली.

आ.अतुल सावे यांनी घाटीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये आय.सी.यु. बेड वाढवावे,डॉक्टरांची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीने त्यांच्या वेतन श्रेणीत वाढ करावी. जेणेकरुन पुरेशज्ञ प्रमाणात डॉक्टर उपलब्ध होतील. त्याचबरोबर औषधी साठा, इंजेक्शनची उपलब्धता  वाढवण्यासाठी शासनाने पाठपुरावा करावा.

 आ. अंबादास दानवे यांनी शासकीय रुग्णालयातील ( घाटी) यंत्रणेचा ताण कमी करण्यासाठी खाजगी रुग्णालयांची उपचार सुविधा उपलब्ध असली पाहिजे. त्यासाठी खाजगी दवाखाने सुरू होण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी. तसेच महात्मा फुले योजनेत कमी लक्षणे असलेल्या बाधितांनाही खासगी रुग्णालयात लाभ देण्यात यावा. असे, श्री. दानवे यांनी सांगितले.

आ. प्रदीप जैस्वाल यांनीही आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्याबाबत सूचना केली.

आ. प्रा. रमेश बोरनारे यांनी वैजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात खाटांची संख्या आणि रुग्णवाहिका सुविधांची उपलब्धता वाढवण्याची सूचना केली. आ.संजय शिरसाठ यांनी खासगी रुग्णालयात आकारल्या जाणाऱ्या देयकांवर नियंत्रण ठेवावे. तसेच घाटी रुग्णालयास औषध खरेदीसाठी तातडीने निधी देण्याची मागणी केली. आ. प्रशांत बंब यांनी ग्रामीण- शहरी भागात ये-जा करणारी गर्दी नियंत्रणात ठेवत अँटीजेन चाचण्यांची संख्या वाढवणे आणि  चाचणी झाल्यानंतर खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक साहित्य आणि निधींची उपलब्धता करुन देण्याची मागणी बंब यांनी केली. आ. उदयसिंग राजपुत यांनी कन्नडमधील आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.

बैठकीस विभागीय आयुक्त सुनील  केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत जी. गव्हाणे, पोलीस महानिरिक्षक डॉ. रविंद्र सिंगल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकरी अधिकरी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, महापालिका वैद्यकीय अधिकारी निता पाडळकर, डॉ. सुधाकर शिंदे, डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य, आरोग्य सेवा महासंचालक डॉ. सुभाष साळुके,  उपसंचालक डॉ. एस.व्ही लाळे, सहाय्यक संचालक डॉ. जी.एम. गायकवाड, नोडल अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, डॉ. गणेश कल्याणकर, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.एन. बारडकर, उपाध्यक्ष  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास प. गांडाळ,  यांच्यासह सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *