शिरसगावच्या तरुणाने बनवली “सौर रिक्षा”

वैजापूर ,३ जून  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील सिरसगाव येथील अण्णासाहेब भिमराव शिंदे या तरुणाने सौर ऊर्जेवर धावणारी रिक्षा विकसित केली असून या संशोधनाची राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने दखल घेतली आहे. 

या विभागाचे कक्ष अधिकारी प्रमोद चौधरी यांनी याबाबत ऊर्जा विकास अभिकरणच्या महासंचालकांना कळवले असून सौर ऊर्जेवर धावणारी इ – वाहने या नाविन्यपुर्ण संशोधन प्रकल्पाची शासन स्तरावर चाचणी व पडताळणी करुन मान्यता मिळण्याबाबत शिफारस केली आहे.‌ या संशोधनामुळे पारंपारिक पद्धतीने चालवणाऱ्या इंजिन रिक्षाऐवजी इलेक्ट्रिक वाहनांकडे वळलेल्या भारतीय वाहन उद्योगात विजेच्या सहाय्याने विद्युत घट (बॅटरी) अधिभारीत (चार्ज) करण्याऐवजी सौर ऊर्जेचा वापर करुन विद्युत घट अधिभारीत करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.‌ परिणामी यातुन विजेची व इंधनाची बचत होणार असुन अतिशय कमी खर्चात वाहन चालवणे शक्य होणार आहे.‌ त्यामुळे उन्हाळ्यात तर अगदी कुठलाही खर्च न करता प्रवासी वाहतुक करणे शक्य होणार आहे. यातुन मोठ्या प्रमाणावर स्वयंरोजगाराला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.‌

अण्णासाहेब शिंदे

तालुक्यातील सिरसगाव येथील रहिवासी असलेले अण्णासाहेब शिंदे हे शेतकरी असुन शेतीवर उदरनिर्वाह करतात. मात्र सौर ऊर्जा या अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताबाबत आवड निर्माण झाल्याने त्यांनी स्वतःच्या घरात देखील सौर ऊर्जेवर विजपुरवठा सुरु केला असुन विजेवर चालणारी सर्व उपकरणे त्यांनी सौर ऊर्जेवर सुरु केली आहेत.‌ कुठलेही अभियांत्रिकी अथवा तांत्रिक शिक्षणाची पदवी नसतांनाही केवळ आवड निर्माण झाल्याने प्रयोगशिल वृत्ती जोपासत ग्रामीण भागातील एका तरुणाने हा प्रयोग यशस्वी केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.‌ अण्णासाहेब शिंदे यांनी वैजापुरचे आमदार रमेश पाटील बोरनारे यांच्या संपर्क कार्यालयात ही रिक्षा आणुन तिचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यावेळी आमदार बोरनारे यांनी या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या या ॲटोमॅटिक रिक्षाची सर्व माहिती जाणून घेतली व शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अविनाश गलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी मिसाळ, महेश बुनगे, रामदास वाघ, प्रदीप साळुंके यांनी शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.

अशी बनवली सौर रिक्षा

सध्या येथील वाहन बाजारात इलेक्ट्रिक वाहनांचे आगमन झाले असुन यात इलेक्ट्रिक रिक्षाचाही समावेश आहे. या रिक्षांची किंमत जवळपास अडीच लाख रुपये आहे. रिक्षात प्रत्येकी 48: व्होल्टेज चार विद्युत घट असुन ते विजेच्या सहाय्याने अधिभारीत केल्यास ही रिक्षा विना इंधनची रस्त्यावर धावते. मात्र यातील विद्युत घटांना सौर ऊर्जेचा वापर करुन अधिभारित केल्यास विजेची मोठी बचत होऊ शकते या उद्देशाने रिक्षाच्या टपावर प्रत्येकी 40 वॅट 12 व्होल्टचे एकुण बारा पॅनल बसवण्यात आले आहेत. या पॅनलच्या माध्यमातुन विद्युत घट अधिभारित करुन रिक्षा चालवली जाते.‌ पॅनलचा खर्च जवळपास वीस हजार रुपये असल्याचे शिंदे यांनी सांगितले.