“कोण होणार करोडपती” या सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमासाठी वैजापुरातून 6 जणांना संधी

वैजापूर ,१ जून  /प्रतिनिधी :- सोनी मराठी वाहिनीवरील “कोण होणार करोडपती” हा बहुचर्चित कार्यक्रम येत्या 6 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमासाठी वैजापुरातून 6 जणांना संधी मिळाली आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळणार आहे. 

शिवसेना नगरसेवक स्वप्नील जेजुरकर व भाजप ओबीसी सेलचे शहराध्यक्ष धनंजय अभंग यांनी “कोण होणार करोडपती” या कार्यक्रमाचे मंगळवारी येथे आयोजन  केले होते. या कार्यक्रमाला तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. मोठ्या प्रमाणात स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सहा विजयी स्पर्धकांना यावेळी गोल्डन पास देण्यात आले. या स्पर्धकांना आपल्या ज्ञानाच्या जोरावर एक करोड रुपये जिंकण्याची संधी मिळाली आहे. सामान्य माणसानं आपल्या ज्ञानाच्या बळावर पैसे जिंकून आपली स्वप्नपूर्ती करावी हाच या मागचा हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.कोण होणार करोडपती हा कार्यक्रम आता महाराष्ट्राच्या  घराघरांत पोचला असून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, खेड्यापाड्यातून स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.